Sachin Tendulkar Appreciates Yashasvi Jaiswal’s Innings: पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. आता जगातील महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही त्याचे कौतुक केले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जैस्वालचे कौतुक करताना त्याला शुभेच्या दिल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जैस्वाल १४३ धावा करून नाबाद परतला. आता सामन्याच्या तिसऱ्या दिवशी तो या शतकाचे द्विशतकात रूपांतर करण्याचा प्रयत्न करेल.
यशस्वी जैस्वालला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी –
तिसऱ्या दिवशी जैस्वालने जर आपल्या खेळीत आणखी ५७ धावांची भर घातली, तर पदार्पणाच्या कसोटीत द्विशतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरेल. सध्या पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा तो १७वा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी २०१३ साली शिखर धवनला ही संधी मिळाली होती, मात्र तो १८७ धावा करून बाद झाला होता.
यशस्वी जैस्वालच्या शानदार शतकानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले, ‘शाब्बास यशस्वी जैस्वाल, तू तुझ्या करिअरची यशस्वी सुरुवात केली आहेस. रोहित शर्माचे आणखी एक शानदार शतक.’ सचिनने आपल्या ट्विटमध्ये कर्णधार रोहित शर्माचे सुद्धा कौतुक केले आहे.
या सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी दुसऱ्या दिवसाची सुरुवात ८०/० वरुन पुढे केली. दोन्ही फलंदाजांनी येथे शतकं झळकावून वेस्ट इंडिज संघाला बॅकफूटवर ढकलले. पहिली विकेट मिळवण्यासाठी वेस्ट इंडिज संघाला खूप घाम गाळावा लागला. रोहित शर्मा १०३ धावा करून बाद झाला. तेव्हा भारताची धावसंख्या २२९ धावांवर पोहोचली होती. रोहित शर्माला अॅलिक एथॅन्झने बाद केले.
हेही वाचा – IND vs WI 1st Test: ‘…म्हणून लाइव्ह सामन्यात यशस्वी जैस्वालने केली शिवीगाळ’; VIDEO होतोय व्हायरल
त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला शुबमन गिल सहा धावा काढून बाद झाला. जोमेल वॅरिकनने त्याला बाद केले. याशिवाय वेस्ट इंडिजचे गोलंदाज भारतीय फलंदाजांवर फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. भारताने ३१२ धावांची भर घातली असून आता पहिल्या डावाच्या आधारे ते वेस्ट इंडिजपेक्षा १६२ धावांनी पुढे आहेत. तत्पूर्वी, सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताने यजमान संघाला अवघ्या १५० धावांवर ऑलआउट केले होते.