Yashasvi Jaiswal’s catch video goes viral: वयाच्या २१व्या वर्षी टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण करणाऱ्या यशस्वी जैस्वालने पहिल्याच सामन्यात शानदार खेळी करत क्रिकेटप्रेमींची वाहवा मिळवली. वेस्ट इंडिजविरुद्ध डॉमिनिका येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी जयस्वालची शानदार खेळी दीडशतकानंतर संपुष्टात आली. तो बाद झाल्यानंतरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यशस्वी जैस्वालने ३८७ चेंडूत १६ चौकार आणि १ षटकार मारत १७१ धावांची खेळी साकारली . कसोटी पदार्पणात द्विशतक झळकावून तो इतिहास रचण्याच्या अगदी जवळ होता, पण त्याची एक चूक त्याला महागात पडली. १२६व्या षटकात जैस्वालने चूकीचा शॉट खेळत आपली विकेट सहज गमावली, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
बाहेर जाणारा चेंडू खेळण्याची केली चूक –
अल्झारी जोसेफचा चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफ-स्टंपपासून थोडा दूर जाऊ लागला होता, तितक्या यशस्वीने हा बाहेर जाणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टिरक्षक जोशुआ दा सिल्वाच्या हाती विसावला. सिल्व्हाने येथे कोणतीही चूक न करता अप्रतिम झेल घेत यशस्वीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र, दुहेरी शतकाजवळ बाद झाल्यानंतर यशस्वी स्वत:ही निराश दिसला. यशस्वीची विकेट मिळाल्यानंतर विंडीजचे चाहते आनंदी होते, तर पॅव्हेलियनमध्ये जाताना विराट कोहलीने त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा – IND vs WI 1st Test: यशस्वी जैस्वालचे हुकले द्विशतक, मात्र तिसऱ्या दिवशीही लावली ‘या’ विक्रमांची रांग
यशस्वीच्या नावावर हे रेकॉर्ड नोंदवले गेले –
यशस्वी जैस्वालने आपल्या कसोटी पदार्पणात १७१ धावांच्या खेळीने अनेक विक्रम केले. भारताबाहेर कसोटी पदार्पणात शतक करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला, तर कसोटी पदार्पणात सर्वाधिक धावा करणारा तो जगातील २४वा खेळाडू ठरला. शिखर धवनच्या १८७ आणि रोहित शर्माच्या १७७ धावांनंतर तो भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. जैस्वाल हा एकूण १७ वा भारतीय आणि कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा तिसरा सलामीवीर ठरला.