भारतीय संघाचा चायनामन फिरकीपटू गोलंदाज कुलदीप यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध विशाखापट्टणम येखील दुसऱ्या वन-डे सामन्यात कुलदीप यादवने हॅटट्रीकची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोनदा हॅटट्रीक नोंदवणारा कुलदीप पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी एकाही भारतीय गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाहीये.

भारताच्या ३८८ धावांचा पाठलाग करताना विंडीजने सावध सुरुवात केली होती. मात्र शाई होप आणि निकोलस पूरन यांनी महत्वपूर्ण भागीदारी रचत विंडीजचं आव्हान कायम राखलं. शमीने एकाच षटकात दोन फलंदाजांना माघारी धाडत विंडीजला हादरा दिला. य़ानंतर कुलदीप यादवने सामन्याच्या ३३ व्या षटकात शाई होप, जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफ यांना बाद करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या हॅटट्रीकची नोंद केली. याआधी कुलदीपने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत असताना वन-डे क्रिकेटमध्ये पहिल्यांदा हॅटट्रीकची नोंद केली होती.