भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीसाठी यंदाचं वर्ष हे अतिशय चांगलं जाताना दिसत आहे. ज्या-ज्या सामन्यात शमीला संधी मिळाली आहे त्या सामन्यात शमीने त्या संधीचं सोनं केलं. २०१९ विश्वचषक, त्यानंतर घरच्या मैदानावरील कसोटी मालिकांमध्ये शमीने आपल्या भेदक माऱ्याने प्रतिस्पर्ध्यांची भंबेरी उडवली. वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात मोहम्मद शमीने २०१९ वर्षातला वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनण्याचा बहुमान पटकावला आहे.
अवश्य वाचा – IND vs WI : कुलदीप यादवची हॅटट्रीक, अनोखी कामगिरी करणारा एकमेव भारतीय गोलंदाज
विंडीजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात शमीने ३ फलंदाजांना माघारी धाडलं. यासोबत शमीच्या खात्यात ४१ बळी जमा झाले असून भारताला आणखी एक सामना खेळायचा आहे. या सामन्यात शमीला आपलं अव्वल स्थान अधिक भक्कम करण्याची संधी आहे. यावेळी शमीने न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टला मागे टाकलं, बोल्टच्या नावावर सध्या ३८ बळी जमा आहेत.
२०१९ वर्षात वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणारे गोलंदाज –
१) मोहम्मद शमी – ४१ बळी
२) ट्रेंट बोल्ट – ३८ बळी
३) लॉकी फर्ग्यसन – ३५ बळी
४) मुस्तफिजुर रेहमान – ३४ बळी
५) भुवनेश्वर कुमार – ३३ बळी
याव्यतिरीक्त दुसऱ्या वन-डे सामन्यात हॅटट्रीक नोंदवणारा भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव या यादीमध्ये ३२ बळींसह सहाव्या स्थानावर आहे. २०१९ वर्षातला भारताचा अखेरचा वन-डे सामना शिल्लक असल्यामुळे कुलदीप यादवला भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडून मोठी झेप घेण्याची संधी आहे. त्यामुळे अखेरच्या वन-डे सामन्यात शमी आणि कुलदीप या दोन्ही गोलंदाजांच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.