सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी शतकी खेळी करत दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताला धावांचा डोंगर उभा करुन दिला. रोहित शर्माने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची पिसं काढत १३८ चेंडूत १५९ धावा केल्या. त्याच्या या खेळीत १७ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता.
गेल्या ३ वर्षांमध्ये रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडतो आहे. २०१७ ते २०१९ या वर्षात रोहित एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरत आला आहे. आतापर्यंत रोहितच्या खात्यात ७५ षटकार जमा झाले असून, विंडीजविरुद्धचा एक वन-डे सामना बाकी आहे.
Most 6s in a Calendar Year
Rohit – 75 (2019)*
Rohit – 74 (2018)
Rohit – 65 (2017)
Abd – 63 (2015)Rohit breaks his own record!#INDvWI
— CricBeat (@Cric_beat) December 18, 2019
दरम्यान, नाणेफेक जिंकून विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फलंदाजांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत द्विशतकी भागीदारी केली. रोहित-राहुल मैदानावर असताना विंडीजचे गोलंदाज हतबल दिसत होते. दोन्ही सलामीवीरांनी आपली शतकं झळकावत विंडीजच्या गोलंदाजांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. अखेरीस अल्झारी जोसेफने लोकेश राहुलला माघारी धाडत भारताची जोडी फोडली. यानंतर कर्णधार विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर रोहित शर्माही शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर होपच्या हाती कॅच देऊन माघारी परतला.