भारताला पाचव्यांदा अंडर-१९ विश्वचषक जिंकून देणाऱ्या टीम इंडियाच्या यंगिस्तानचा आज अहमदाबादमध्ये गौरव करण्यात येणार आहे. १९ वर्षांखालील संघाचे सर्व खेळाडू विशेष पाहुणे म्हणून दुसरा एकदिवसीय सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. सामना संपल्यानंतर गुजरात क्रिकेट असोसिएशन या सर्व खेळाडूंचा सन्मान करणार आहे. मात्र, कोविड नियमांमुळे अंडर-१९ संघाचे खेळाडू भारताच्या वरिष्ठ संघातील खेळाडूंना भेटू शकणार नाहीत.
भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतातील चार खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. अशा परिस्थितीत कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. विश्वचषक विजेत्या संघात समाविष्ट असलेल्या प्रत्येक खेळाडूला ४० लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफला २५ लाख रुपये देण्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे.
हेही वाचा – IND vs WI : विराट म्हणजे विक्रमच..! मैदानात उतरताच किंग कोहलीनं ठोकलं शतक
अंडर-१९ विश्वचषक २०२२मध्ये, भारताने गट टप्प्यात दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि युगांडा यांचा पराभव केला. यानंतर, गतविजेता (२०२०) बांगलादेश संघ उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. त्यानंतर उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचा पराभव केला. टीम इंडियाने फायनलमध्ये इंग्लंडचा चार गडी राखून पराभव करत पाचव्यांदा जेतेपदावर कब्जा केला. भारत हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. भारतानंतर ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे.
भारताने विक्रमी आठ वेळा अंडर-१९ विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला आहे. त्याचबरोबर गेल्या चार स्पर्धांपासून भारतीय संघ सातत्याने फायनल खेळत आहे.