भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्यातला संगीत खुर्चीचा खेळ सुरुच आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटने रोहित शर्माला पुन्हा एकदा मागे टाकलं आहे. गेल्या काही सामन्यांपासून भारताच्या या दोन्ही फलंदाजांमध्ये पहिल्या स्थानासाठी चढाओढ सुरु आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने १५ धावा केल्या तर कर्णधार विराट कोहली १९ धावा काढून माघारी परतला. या छोटेखानी खेळीत विराटने रोहितला माघारी धाडलं असून सध्या त्याच्या आणि रोहितच्या धावांमध्ये अवघ्या एका धावेचा फरक आहे.

दरम्यान, दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला १७० धावांवर रोखण्यात विंडीजचे गोलंदाज यशस्वी झाले. नाणेफेक जिंकत विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय विंडीजच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. शिवम दुबेचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज त्यांच्या लौकिकाला साजेशी खेळी करु शकला नाही. विंडीजकडून हेडन वॉल्श आणि केजरिक विल्यमस यांनी प्रत्येकी २-२ तर पेरी, शेल्डन कोट्रेल आणि जेसन होल्डरने १-१ बळी घेतला.

अवश्य वाचा – IND vs WI : वा दुबेजी वा ! मुंबईकर शिवमने झळकावलं पहिलं अर्धशतक

Story img Loader