तिरुअनंतपुरमच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजी करत मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. मुंबईकर शिवम दुबेचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज त्याच्या लौकिकाला साजेशी खेळी करु शकला नाही.

अवश्य वाचा – IND vs WI : वा दुबेजी वा ! मुंबईकर शिवमने झळकावलं पहिलं अर्धशतक

तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या शिवम दुबेने कर्णधार विराट कोहली सोबत महत्वपूर्ण भागीदारी रचत भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. यादरम्यान शिवमने आपलं टी-२० क्रिकेटमधलं पहिलं अर्धशतक झळकावलं. त्याने ३० चेंडूत ५४ धावांची खेळी केली, त्याच्या या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.

या ४ षटकारांपैकी ३ षटकार शिवमने विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डच्या षटकात ठोकले. सामन्यात नववं षटक टाकणाऱ्या पोलार्डच्या गोलंदाजीवर शिवम दुबेने हल्लाबोल चढवत तुफान फटकेबाजी केली. पाहा शिवमच्या या आक्रमक फलंदाजीचा एक झलक…

या मालिकेतला अखेरचा सामना ११ तारखेला मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ जिंकून मालिकेत बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – ….तर कितीही धावा करा, कमीच पडतील – विराट कोहली

Story img Loader