Ishan Kishan Reveals About Virat Kohli: भारत आणि वेस्ट इंडिज संघांत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना त्रिनिदाद येथे खेळला जात आहे. या सामन्यात इशान किशनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. भारताच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीच्या जागी इशान चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. भारताच्या दुसऱ्या डावात कोहली फलंदाजीला येऊ न शकल्याने चाहत्यांना आश्चर्य वाटले. मात्र चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इशान किशनने याबद्दल खुलासा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला का आला नाही सांगितले. त्याचबरोबर त्याला संधी दिल्याबद्दल किंग कोहलीचे आभारही मानले आहेत. अर्धशतकी खेळी खेळल्यानंतर इशानने कोहलीचे आभार मानले आणि सांगितले की, “त्याने मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी जाण्यास सांगितले, मला विराट भाईचे आभार मानायचे आहेत.”

भारतीय यष्टीरक्षक पुढे म्हणाला, “हे अर्धशतक खरोखरच खास होते. कारण मला माहित होते की, संघाला माझ्याकडून काय हवे आहे. सर्वांनी मला पाठिंबा दिला. विराट भाईने मला पाठिंबा दिला आणि मला सांगितले, ‘जा आणि आपली खेळी खेळ. आशा करूया की उद्याचा खेळ पूर्ण करू. विराट भाईने पुढाकार घेत मला सांगितले, मी फलंदाजीसाठी जावे. तिथे एक डावखुरा गोलंदाज होता, जो गोलंदाजी करत होता. त्यामुळे कधी-कधी तुम्हाला हा कॉल घ्यावा लागतो.”

भारत दुसरा कसोटी सामना जिंकेल – इशान किशन

कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवसाबाबत किशन म्हणाला की, ‘उद्याचा खेळ चांगला व्हायला हवा.आम्हाला चेंडू योग्य ठिकाणी टाकणे आवश्यक आहे आणि लवकर विकेट घेणे खूप महत्त्वाचे आहे. वनडे आणि टी-२० संघात सामील होणे हे माझे एक स्वप्न होते. मला फक्त खेळपट्टीवर जाऊन प्रत्येक चेंडूवर फटके मारायचे होते. मी मुख्यतः माझ्या पालकांचा आभारी आहे, ज्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला.”

हेही वाचा – ODI World Cup 2023: वनडे विश्वचषकासाठी वसीम जाफरने निवडला आपला १५ सदस्यीय संघ, ‘या’ खेळाडूंना दिली पसंती

शनिवारचा खेळ पावसामुळे काही प्रमाणात वाया गेला होता. त्यामुळे रविवारी चौथ्या दिवशी सामना अर्धा तास आधी सुरू झाला होता. भारताने पहिल्या डावात ४३८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने पहिल्या डावात २५५ धावा केल्या. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात २ बाद १८१ धावा करून दुसरा डाव घोषित केला. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाला ३६५ धावांचे लक्ष्य मिळाले. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाने दुसऱ्या डावात ३२ षटकांत २ बाद ७६ धावा केल्या आहेत. त्यांना अजून २८९ धावांची गरज आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi 2nd test ishan kishan revealed about coming to bat at number four in place of virat kohli vbm