वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने विंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यावर आपली पकड मजबूत केली. दुसऱ्या दिवसअखेर विंडीजची अवस्था ७ बाद ८७ अशी दयनीय झाली. जसप्रीत बुमराहने हॅटट्रीक घेत वेस्ट इंडिजचे सहा गडी  माघारी धाडले. त्यामुळे भारताकडे अद्याप ३२९ धावांची आघाडी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचा पहिला डाव ४१६ धावांत आटोपला. भारताच्या या डावात विशेष चर्चा झाली ती नवव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरून अर्धशतक झळकावणाऱ्या इशांत शर्माची.. इशांतने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठोकले. त्याने ८० चेंडूत ५७ धावांची दमदार खेळी केली. इशांतने केलेल्या अर्धशतकानंतर पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या सहकाऱ्यांनी त्याचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. पण कर्णधार विराट कोहलीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. इशांतचे अर्धशतक पूर्ण होताच विराटने उडी मारून आणि हात वर करून त्याचे अर्धशतक साजरे केले. तसेच टाळ्या वाजवून त्याच्या खेळीला मनसोक्त दाद दिली.

इशांतने या आधी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३१ धावा केल्या होत्या. मोहालीला झालेल्या ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात आणि गॉल येथील श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात त्याने प्रत्येकी ३१ धावा केल्या होत्या. ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या होती. मात्र कसोटीतील पहिले अर्धशतक झळकवण्यासाठी त्याला ९२ कसोटी सामने खेळावे लागले.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी भारताचा डाव ४१६ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरादाखल विंडीजच्या डावाची सुरुवात खराब झाली. जसप्रीत बुमराहने विंडीजच्या डावाला खिंडार पाडत यजमान संघाला बॅकफूटवर ढकलले. ब्राव्हो, ब्रूक्स आणि रोस्टन चेस या तिन्ही फलंदाजांना माघारी धाडत त्याने हॅटट्रीकची नोंद केली. मधल्या फळीत शिमरॉन हेटमायरने कर्णधार जेसन होल्डरच्या साथीने छोटेखानी भागीदारी रचत विंडीजचा डाव सावरला. मात्र हे दोन्ही फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. त्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना वेस्ट इंडिजची अवस्था ७ बाद ८७ अशी झाली.