Joshua Da Silva’s mother breaks down in tears after meeting Virat Kohli: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना त्रिनिदाद येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना ४३८ धावा केल्या. या सामन्यात विराट कोहलीने आपले ७६ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. विराट कोहलीसाठी हा क्षण खूप खास होता. या सामन्यानंतर विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

विराट कोहलीने आपल्या ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात १२१ धावांची खेळी साकारली. तसेच अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला. विराट कोहलीने पुन्हा एकदा आपल्या खेळीने चाहत्यांची मने जिंकली. सामना संपल्यानंतर विराट कोहलीला भेटल्यानंतर जोशुआ दा सिल्वाच्या आईला अश्रू अनावर झाले. विराट कोहलीला पाहण्यासाठीच ती स्टेडियममध्ये आली होती.

सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजच्या यष्टीरक्षकाने विराट कोहलीला सांगितले होते की, त्याने या सामन्यात शतक झळकावे, अशी माझी इच्छा आहे. त्याचबरोबर त्याची आई फक्त विराट कोहलीला पाहण्यासाठीच स्टेडियममध्ये आली आहे, असेही तो म्हणाला. विराट कोहलीला पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आलेल्या जोशुआ दा सिल्वाच्या आईने आपल्या मुलाला आधीच सांगितले होते की, ती फक्त विराट कोहलीसाठीच स्टेडियममध्ये येत आहे. आता तिचे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले आहे.

सामना संपल्यानंतर जोशुआ दा सिल्वाच्या आईने विराट कोहलीची भेट घेतली आणि भेटल्यानंतर ती खूप भावूक झाली. विरोधी संघातील खेळाडू असोत किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य, सगळेच विराट कोहलीचे चाहते आहेत. विराटच्या या गोष्टी त्याला एक महान खेळाडू बनवतात. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा – IND vs WI 2nd Test: विराट कोहलीने शतक झळकावत सर डॉन ब्रॅडमनच्या ‘या’ मोठ्या विक्रमाशी केली बरोबरी

विराटला भेटल्यानंतर जोशुआची आई काय म्हणाली?

विराट कोहलीला भेटण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचलेल्या जोशुआ दा सिल्वाच्या आईने त्याला मिठी मारली. त्यानंतर त्याच्या शानदार फलंदाजीसाठी त्याचे अभिनंदन केले. विराट कोहलीला भेटल्यानंतर त्याच्या आईने सांगितले की, ती आणि तिचा मुलगा जोशुआ विराट कोहलीचे मोठे चाहते आहेत. विराट आपल्या देशात क्रिकेट खेळतोय ही खूप मोठी गोष्ट आहे, असेही जोशुआच्या आईने सांगितले.

Story img Loader