टी-२० आणि वन-डे मालिकेत बाजी मारल्यानंतर भारताने कसोटी मालिकेवरही भारताने आपलं वर्चस्व प्राप्त केलं आहे. अँटीग्वा कसोटीत बाजी मारल्यानंतर जमैका कसोटीतही भारताने विंडीजला बॅकफूटवर ढकललं आहे. वेस्ट इंडिजला विजयासाठी ४६८ धावांचं आव्हान दिल्यानंतर, भारताने तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस यजमानांच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडण्यात यश मिळवलं आहे. दुसऱ्या डावात इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी १-१ बळी घेत यजमान संघाला बॅकफूटवर ढकललं. मोहम्मद शमीने या सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये बळींचं दीड शतक साजरं केलं. शमीने आपल्या ४२ व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली आहे.

सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये बळींचं दीड शतक साजरं करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शमी आता तिसऱ्या स्थानावर आहे. शमीने झहीर खान आणि इशांत शर्मा यांना मागे टाकलं आहे. या यादीमध्ये कपिल देव आणि जवागल श्रीनाथ हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.

दरम्यान भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली आहे. विंडीजच्या क्रेग ब्रेथवेटला इशांत शर्माने यष्टीरक्षक पंतकडे झेल द्यायला भाग पाडलं. यानंतर कॅम्पबेल आणि ब्राव्हो यांची छोटेखानी भागीदारी रंगली. यानंतर विराट कोहलीने तात्काळ मोहम्मद शमीला गोलंदाजी देत, विंडीजला धक्का दिला. शमीने कॅम्पबेलला कर्णधार विराट कोहलीच्या हाती झेल द्यायला भाग पाडत विंडीजला दुसरा धक्का दिला. अखेरीस तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विंडीजने ४५ धावांपर्यंत मजल मारली होती. हा सामना जिंकण्यासाठी विंडीजला अजुनही ४२३ धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे चौथ्या दिवसाच्या खेळात विंडीजचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा कसा सामना करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader