Virat Kohli breaks Jacques Kallis and Ricky Ponting Record: त्रिनिदाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील ५०० वा सामना आहे. विराट कोहलीने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद ८७ धावा केल्या आहेत. या खेळीसह, कोहलीने जॅक कॅलिस आणि रिकी पाँटिंगसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याचबरोबर विराट कोहली आपल्या ५०० ​​व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज बनला. या सामन्यात कोहलीने ९७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सामन्याच्या पहिल्या दिवशी ८७ धावांवर नाबाद राहिलेला विराट कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत एका स्थानाने प्रगती करत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी जॅक कॅलिस पाचव्या स्थानावर होता. आता तो खाली घसरला आहे.

जॅक कॅलिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५, ५३४ धावा केल्या आहेत. पण आता विराट कोहलीच्या आता २५,५४८ धावा झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत, तर कुमार संगकारा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तर रिकी पाँटिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – IND vs WI 2nd Test: रोहित शर्माने धोनी-सेहवागला मागे टाकत ‘या’ विक्रमाची केली नोंद

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप-६ फलंदाज –

सचिन तेंडुलकर – ३४३५७ धावा
कुमार संगकारा – २८०१६ धावा
रिकी पाँटिंग – २७४८३ धावा
महेला जयवर्धने – २५९५७ धावा
विराट कोहली – २५५४८ धावा
जॅक कॅलिस – २५५३४ धावा

विराट कोहलीने २००० धावा पूर्ण केल्या –

विराट कोहलीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये २००० धावा पूर्ण केल्या आहेत. विराट रोहित शर्मानंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला. रोहित शर्मानेही वेस्ट इंडिजविरुद्धच्या ८० धावांच्या खेळीत हा पराक्रम केला. आता त्याच्यापाठोपाठ किंग कोहलीनेही याच सामन्यात ही कामगिरी केली.

हेही वाचा – IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

विराट कोहलीने रिकी पाँटिंगला टाकले मागे –

घराबाहेर सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली आता चौथ्या स्थानावर आला आहे. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ८७ धावांच्या खेळीनंतर कोहलीच्या आता १४३७६ धावा झाल्या आहेत, तर रिकी पाँटिंगने १४,३६६ धावा केल्या आहेत. आता तो पाचव्या क्रमांकावर घसरला आहे.

विदेशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारे टॉप- 5 फलंदाज –

२०१६५ धावा – सचिन तेंडुलकर
१५९७३ धावा – कुमार संगकारा
१५२०४ धावा – राहुल द्रविड
१४३७६ धावा – विराट कोहली
१४३६६ धावा – रिकी पाँटिंग

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi 2nd test virat kohli breaks jacques kallis and ricky ponting record vbm