Virat Kohli’s Reaction After Century: वेस्ट इंडिज दौऱ्यावर विराट कोहलीने परदेशी भूमीवर कसोटी शतकाची प्रतीक्षा अखेर संपवली. पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथे सुरू असलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळात कोहलीने आपले २९वे शतक पूर्ण केले. याआधी कोहलीने २०१८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पर्थ कसोटी सामन्यात शेवटचे विदेशात शतक झळकावले होते. आपल्या शतकी खेळीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना कोहली म्हणाला की, हे सर्व टप्पे त्याच्यासाठी फारसे महत्त्वाचे नाहीत.
वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाचा पहिला डाव ४३८ धावांवर आटोपला, ज्यामध्ये विराट कोहलीच्या बॅटमधून १२१ धावांची खेळी पाहिला मिळाली. त्याने २०६ चेंडूचा सामना करताना ११ चौकार लगावले. तसेच कर्णधार रोहित शर्माने ८०, रवींद्र जडेजाने ६१, तर यशस्वीने ५७ आणि अश्विनने ५६ धावांचे योगदान दिले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा वेस्ट इंडिज संघानेही १ गडी गमावून ८६ धावा केल्या होत्या.
हे आकडे आणि टप्पे माझ्यासाठी फारसे महत्त्वाचे नाहीत –
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराट कोहलीने आपल्या शतकी खेळीवर प्रतिक्रिया दिली. विराट कोहली म्हणाला की, “मला फक्त संघासाठी योगदान द्यायचे आहे. जर मी ५० धावा केल्या असत्या, तर माझे शतक हुकले असते आणि जर मी १२० धावा केल्या असत्या, तर माझे दुहेरी शतक हुकले असते. अशा परिस्थितीत हे आकडे आणि टप्पे माझ्यासाठी फारसे महत्त्वाचे नाहीत. संघाच्या विजयात तुम्ही कसे योगदान देता, हे अधिक महत्त्वाचे आहे.”
हेही वाचा – कुस्ती महासंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र अपात्र; ‘डब्लूएफआय’ची निवडणूक १२ ऑगस्टला
माझ्यासाठी फिटनेस सर्वात महत्त्वाचा आहे –
विराट कोहली पुढे म्हणाला की, “माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिटनेस, ज्यामुळे मला सतत चांगले बनण्यास मदत होते. देशासाठी ५०० सामने खेळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मी माझ्या मेहनतीने हे सर्व साध्य करू शकलो. इथपर्यंत पोहोचण्याचा विचार कधीच केला नव्हता.”