India vs West Indies T20 :भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना आज (२ ऑगस्ट) रोजी सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क खेळवला जाणार आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होणार होता. परंतु, वेस्ट इंडीज क्रिकेट नियामक मंडळाने (क्रिकेट वेस्ट इंडीज) यामध्ये बदल केला आहे. तिसरा टी २० सामना भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल. विशेष म्हणजे सोमवारी (१ ऑगस्ट) याच ठिकाणी झालेला दुसरा सामनाही तीन तास उशिराने सुरू झाला होता.

दोन्ही संघांनी मालिकेतील प्रत्येक एक सामना जिंकून बरोबरी साधली आहे. भारताने पहिला टी २० सामना ६८ धावांनी जिंकला होता. तर, दुसऱ्या सामन्यामध्ये ५ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीजला शेवटच्या षटकात १० धावांची गरज होती. कर्णधार रोहित शर्माने आवेश खानकडे चेंडू सोपवला. पण, आवेश खान अपेक्षित कामगिरी करू शकला नाही.

दुसरा सामना शेवटच्या षटकापर्यंत ताणला गेल्याने तिसरा सामनाही तितकाच रंजक होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. वॉर्नर पार्कची खेळपट्टी तटस्थ असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे याठिकाणी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही चांगली मदत मिळण्याची अपेक्षा आहे. काल झालेल्या सामन्यात वेस्ट इंडीजच्या गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही खेळपट्टीने मदत केल्याचे दिसले.

सामन्याच्या दिवशी ताशी पाच ते सात किलो मीटर वेगाने वारे वाहण्याची अपेक्षा आहे. तर, तापमान २७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. खेळादरम्यान पावसाची शक्यता नाही. मात्र, वेस्ट इंडीजचे हवामान लहरी स्वरुपाचे असल्यामुळे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तर आश्चर्य वाटणार नाही.

हेही वाचा – IND vs WI 2nd T20 : सूर्यकुमार यादवकडे कपड्यांचा तुटवडा? सामन्यात घातली अर्शदीप सिंगची जर्सी

भारत संभाव्य संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंग.

वेस्टइंडीज संभाव्य संघ: कायले मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, डेव्हॉन थॉमस (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, अकील होसेन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, ओबेड मॅकॉय.

Story img Loader