भारत विरुद्ध विंडीज वन डे मालिकेतील अंतिम सामना त्रिवेंद्रम येथे गुरुवारी होणार आहे. सोमवारी झालेला चौथा सामना जिंकून भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे अंतिम सामना जिंकून मालिका ३-१ ने खिशात घालण्याचा भारताचा मानस असणार आहे. पण हा विजय सहजासहजी मिळू शकणार नाही. २-०ने कसोटी मालिका गमावल्यानंतर विंडीजला कमी लेखण्याची चूक भारताने वन डे मालिकेच्या सुरुवातीला केली होती. परिणामी, पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा सामन्यात बरोबरीत रोखण्यात तर तिसरा सामना जिंकण्यात विंडीजच्या संघाला यश आले होते. भारताने चौथा सामना जिंकून पुन्हा लयीत आल्याचे दाखवले, पण विंडीजचे असे पाच खेळाडू आहेत जे भारताला भारी पडू शकतात. भारत जरी ३-१ ने मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला तरी हे पाच खेळाडू विंडीजला सामना जिंकवून देत मालिकेत २-२ अशी बरोबरी राखू शकतात.

१. शाई होप – भारताच्या विजयात सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो तो म्हणजे विंडीजच्या वरच्या फळीतील फलंदाज शाई होप. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात होपने शेवट्पर्यंत लढत दिली. शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत होपने भारताच्या बरोबरीची धावसंख्या केली व सामना अनिर्णित राखली. त्यानंतर तिसऱ्या सामन्यातही त्याने शतकी खेळी केली. याच खेळीच्या जोरावर विंडीजने भारतावर विजय मिळवला. एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही होप २५० धावांसह संयुक्त तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापुढे भारतीय कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा आहे. शेवटच्या सामन्यात होपची बॅट तळपली तर भारतासाठी विजय मिळवणे दुरापास्त होऊ शकते.

२. शिमरॉन हेटमायर – हेटमायर हा विंडीजसाठी मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज म्हणून या मालिकेत उदयास आला आहे. मालिकेत २५० धावा करून होपबरोबर तो संयुक्त तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेत हेटमायरच्या बॅटमधून ४ सामन्यात एकूण १६ षटकार निघाले आहेत तर त्याच्या एकूण धावांपैकी सुमारे ६१ टक्के धावा या चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून आल्या आहेत. हेटमायरने भारतीय गोलंदाजीची अशीच कत्तल शेवटच्या सामन्यात केली, तर भारताच्या गोलंदाजांना हतबल होण्यावाचून पर्याय राहणार नाही.

३. जेसन होल्डर – विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर हा भारताच्या विजयात मोठा अडथळा ठरू शकतो. याचे महत्वाचे कारण म्हणजे त्याची अष्टपैलू कामगिरी. जेसन होल्डर हा कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करताना दिसत आहे. कसोटी मालिकेतही त्याने दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात भारताला स्वस्तात गुंडाळले होते. तोच फॉर्म सुरु ठेवत वन डे मालिकेतही तो उत्तम कामगिरी करत आहे. होल्डरने या मालिकेत १३६ धावा केल्या असून यात १ अर्धशतक (५४*) समाविष्ट आहे. गोलंदाजीत मात्र त्याला केवळ २ गडीच टिपता आले आहेत. पण इतर संघ ढेपाळल्यावर होल्डरने केलेली नाबाद अर्धशतकी खेळी त्याची उपयुक्तता सांगून गेली आहे.

४. अॅश्ले नर्स – या मालिकेत विंडीजने जिंकलेल्या एकमेव सामन्यासाठी नर्स हा सामनावीर ठरला होता. विंडीजसाठी कुलदीप यादव हा कर्दनकाळ ठरत आहे. त्याचप्रकारची गोलंदाजी नर्स भारताविरुद्ध करताना दिसत आहे. नर्सने ४ सामन्यात ५बळी टिपले असून तो सार्वधिक बळी टिपणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत संयुक्त दुसऱ्या स्थानी आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही तो टॉप १० मध्ये असून त्याने १२५ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे.

५. मार्लन सॅम्युअल्स – सॅम्युअल्स हा विंडीजचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. मोठ्या किंवा निर्णायक सामन्यात मोठी खेळी करण्यात सॅम्युअल्स पटाईत आहे. श्रीलंकेविरुद्ध टी२० विश्वचषक सामन्यात त्याने केलेली ७८ धावांची खेळी हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. या मालिकेत त्याच्याकडून फारशी चांगली कामगिरी झालेली नाही. पण विंडीजने जिंकलेल्या सामन्यात मोक्याच्या क्षणी गोलंदाजी करत सॅम्युअल्सने विराट कोहलीचा अडसर दूर केला होता. त्यामुळे हा विंडीजसाठी एकप्रकारे पत्त्याच्या खेळातील ‘जोकर’ ठरू शकतो.

Story img Loader