Sachin Tendulkar Praises Virat After Century: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील हे २९ वे शतक आहे. विराट कोहलीने २०६ चेंडूत १२१ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार मारले. या शतकानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याचे कौतुक केले आहे.
मात्र, भारताच्या माजी कर्णधाराने २०१८ नंतरचा परदेशी भूमीवर कसोटी सामन्यातील शतकाचा दुष्काळ संपवला. खरंतर विराट कोहली दीर्घकाळ परदेशी भूमीवर कसोटी सामन्यांमध्ये शतक झळकावू शकला नव्हता, पण या सामन्यात चाहत्यांची प्रतीक्षा संपली. दरम्यान विराट कोहलीन सचिन तेंडुलकरचा एक विक्रमही मोडला.
सचिन तेंडुलकरने इन्स्टावर शेअर केली विराटची स्टोरी –
विराट कोहली विक्रमी शतकानंतर सोशल मीडियावर टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. सोशल मीडियावर चाहते त्यांच्या आवडत्या क्रिकेटरचे सतत कौतुक करत आहेत. मात्र, आता क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने विराट कोहलीच्या शतकाचे कौतुक केले आहे. सचिन तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.
या स्टोरीत विराट कोहलीचा फोटो दिसत आहे. त्याचबरोबर सचिन तेंडुलकरने कॅप्शनमध्ये लिहले, ‘अजून एक दिवस, आणखी एक शतक’. मात्र, सचिन तेंडुलकरची इन्स्टाग्राम स्टोरी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.
विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम –
विशेष म्हणजे या शतकाच्या जोरावर कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. कारकिर्दीतील ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. विराटने वेस्ट इंडिजविरुद्ध १२वे शतक झळकावले. ५०० व्या कसोटीपर्यंत सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत कोहलीने सचिनला मागे टाकले. सचिनने ५०० सामन्यांमध्ये ७५ शतके ठोकली होती. तर कोहलीने ७६ शतके झळकावली आहेत.
हेही वाचा – Virat Kohli : “माझ्यासाठी विक्रम आणि टप्पे महत्त्वाचे नाहीत, तर…”; शतकानंतर विराट काय म्हणाला? घ्या जाणून
सामन्याबद्दल बोलायचे तर, वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाचा पहिला डाव ४३८ धावांवर आटोपला, ज्यामध्ये विराट कोहलीच्या बॅटमधून १२१ धावांची खेळी पाहिला मिळाली. त्याने २०६ चेंडूचा सामना करताना ११ चौकार लगावले. तसेच कर्णधार रोहित शर्माने ८०, रवींद्र जडेजाने ६१, तर यशस्वीने ५७ आणि अश्विनने ५६ धावांचे योगदान दिले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा वेस्ट इंडिज संघानेही १ गडी गमावून ८६ धावा केल्या होत्या.