India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला गुरुवारी (३ ऑगस्ट) सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने चार धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. हा भारताचा टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील २००वा सामना होता. टीम इंडिया हा सामना संस्मरणीय बनवू शकली नाही. या पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. आयसीसीने हार्दिक पांड्याचा कर्णधार असलेल्या संघाला दंड ठोठावला आहे. एवढेच नाही तर सामना जिंकणारा वेस्ट इंडिजचा संघही त्यातून सुटू शकला नाही.
भारत आणि वेस्ट इंडिजला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावला आहे. आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “भारत किमान ओव्हर-रेटपेक्षा एक षटक कमी करण्यासाठी दोषी होता, तर वेस्ट इंडीज दोन षटके कमी होते. किमान ओव्हर-रेटपेक्षा एक ओव्हर कमी केल्याबद्दल भारताला त्यांच्या मॅच फीच्या पाच टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. किमान ओव्हर-रेटपेक्षा दोन षटके कमी राहिल्याबद्दल वेस्ट इंडिजला त्यांच्या मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.” सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी हार्दिक पांड्या आणि रोव्हमन पॉवेल यांच्या संघांना अनुक्रमे एक आणि दोन षटके कमी असल्याने दंड ठोठावला.
हार्दिक आणि पॉवेलने चूक मान्य केली
खेळाडू आणि खेळाडू सपोर्ट कर्मचार्यांसाठी ICC आचारसंहितेचा कलम २.२२ किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आहे. आयसीसीने सांगितले की, खेळाडूंना त्यांच्या संघाना दिलेल्या वेळेत पूर्ण षटक टाकण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांच्या मॅच फीच्या पाच टक्के दंड आकारला जातो. मॅच फीच्या ५० टक्के कॅपच्या अधीन राहून हा दंड वसूल केला जातो.” आयसीसीने पुढील सुनावणी आवश्यक नसल्याचे सांगितले. कारण हार्दिक आणि पॉवेल यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
काय घडलं मॅचमध्ये?
विंडीजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संघाने २० षटकांत ६ बाद १४९ धावा केल्या. टीम इंडियाला १५० धावांचे सोपे लक्ष्य गाठता आले नाही आणि २० षटकात ९ गडी गमावून १४५ धावाच करता आल्या. या विजयासह वेस्ट इंडिजने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजच्या विजयात जेसन होल्डरने चेंडूने महत्त्वाची भूमिका बजावली. जेसन होल्डरने कर्णधार हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसनची विकेट एकाच षटकात गमावल्यानंतर सामना पूर्णपणे वेस्ट इंडिजकडे वळला आणि त्यांना ४ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. आता ६ ऑगस्टला उभय संघांमध्ये दुसरा टी२० सामना होणार आहे.