India vs West India: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील चौथा टी२० फ्लोरिडा, USA म्हणजेच अमेरिकेत खेळला गेला. टीम इंडियाने त्या सामन्यात नऊ गडी राखून वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय मिळवला. या विजयाने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान दुसऱ्याच षटकात स्टार यष्टीरक्षक संजू सॅमसनने हवेत उंच उडी मारत अफलातून झेल टिपला. त्याच्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यासह त्याने के.एल. राहुल आणि इशान किशन यांना आशिया कप २०२३आधी आव्हान दिले आहे. वास्तविक, आशिया कपसाठी टीम इंडियाला आपला परफेक्ट विकेटकीपर शोधायचा आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी२०मध्ये संजू सॅमसनने विकेटकीपिंग करताना शानदार झेल घेतला. वास्तविक, सामन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजचा संघ खूपच आक्रमक दिसत होता. दुसऱ्याच षटकात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने काइल मेयर्सचा शानदार झेल घेतला. त्याच्या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या झेलच्या व्हिडीओवर चाहते मजेशीर कमेंट्स देखील करत आहेत. टीम इंडियाला अशाच परफेक्ट विकेटकीपरची गरज असून आशिया कपमध्ये त्याची निवड होऊ शकते.
आशिया कपपूर्वी राहुल आणि किशनला दिलेले आव्हान
संजू सॅमसनच्या झेलने के.एल. राहुल आणि इशान किशन अडचणीत आले आहेत. आशिया चषक २०२३च्या आधी हा शानदार झेल घेऊन एकप्रकारे त्याने या दोघांना आव्हान दिले आहे. कारण हे तिन्ही खेळाडू आशिया कपसाठी टीम इंडियाच्या संघात सामील होण्यासाठी दावेदार ठोकत आहेत. जरी के.एल. राहुल दुखापतग्रस्त असला तरी आशिया चषकापूर्वी तो पुनरागमन करेल. अशा परिस्थितीत संजू सॅमसनने शानदार झेल घेत राहुल आणि इशानच्या अडचणी वाढवल्या आहेत.
संजूची बॅट आतापर्यंत खूप शांत होती
टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने अप्रतिम झेल घेतला असेल. पण वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत त्याने फलंदाजीत फारशी चांगली कामगिरी केलेली दिसत नाही. पहिल्या टी२०मध्ये त्याने १२ धावा केल्या, दुसऱ्यामध्ये ७ धावा आणि तिसऱ्या सामन्यात त्याची फलंदाजी येऊ शकली नाही. संजूने दोन टी२० सामन्यांमध्ये केवळ १९ धावा केल्या आहेत, त्याला मोठी धावसंख्या करण्याची उत्तम संधी मिळाली होती मात्र, त्याने ती गमावली.
सामन्यात काय झाले?
चौथ्या टी२० सामन्यात भारताचे सलामीवीर फलंदाज शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांना अक्षरशः धुतले, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. दोघांनी तुफानी आपापली अर्धशतके झळकावत भारताला ९ विकेट्सने विंडीजचा धुव्वा उडवला. पहिल्या विकेटसाठी तब्बल १६५ धावांची विक्रमी भागीदारी करत टीम इंडियाला सहजरीत्या सामना जिंकवून दिला.