Rohit Sharma on Virat Kohli: रोहित शर्माच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या २०२३-२५ ​​चक्राची शानदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० ने जिंकली. पावसाने व्यत्यय आणलेली दुसरी कसोटी अनिर्णित राहिली असेल, पण या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने १२१ धावा केल्या. किंग कोहलीच्या या शतकी खेळीचा रोहित शर्मा चाहता झाला आहे. हिटमॅनने विराटचे जोरदार कौतुक केले आहे. संघातील उर्वरित खेळाडूंनाही त्याने यातून शिकण्यास सांगितले आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने मालिका विजय संपादन केल्यानंतर कर्णधार रोहितने प्रेझेंटेशन कार्यक्रमादरम्यान विराट कोहलीचा विशेष उल्लेख केला. कोहलीचे नाव घेताना रोहित दुसऱ्या डावात इशान किशनच्या महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळीबद्दल त्याचे कौतुक केले. रोहित म्हणाला, “कसोटी सामन्यांमध्ये तुम्हाला विराटसारखा खेळाडू हवा असतो जो डाव सावरून पुढे नेऊ शकतो. गेले अनेक वर्ष तो हे काम करत असून टीम इंडियाला अजून अशा अनेक खेळाडूंची गरज आहे. त्याने अप्रतिम कामगिरी केली.”

हेही वाचा: Rohit Sharma: “हे मुंबई की त्रिनिदाद?” दुसऱ्या कसोटीनंतर रोहित शर्माने हे ट्वीट का केले? कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल

कर्णधार रोहित पुढे म्हणाला की, “युवा खेळाडूंनी प्रत्येक गोष्टीचे मिश्रण फलंदाजीत ठेवायले हवे आहे, मग ते डिफेन्स करून विकेट सांभाळणे असो किंवा मोक्याच्या वेळी मोठे फटके मारून धावसंख्या वाढवणे. एक क्रिकेटर या दोन्ही गोष्टी परिस्थितीनुसार त्या-त्या वेळी करणे आवश्यक आहे. हेच विराट अनेक वर्षे करत आला आहे.”

पुढे रोहित म्हणाला की, “आमच्याकडे फलंदाजी आणि गोलंदाजीत वैविध्यता आहे. आम्ही संघाचा समतोल व्यवस्थित सांभाळला आहे. तुम्हाला नेहमीच योग्य पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. एक संघ म्हणून नेहमीच सकारत्मक असणे हे गरजेचे असून जे काय होईल ते चांगलेच असेल, यावर माझा विश्वास आहे. आम्ही भारतीय क्रिकेट संघाच्या अंतिम सामन्यावर म्हणजेच डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. यावेळी ती ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे. सध्या आम्ही खेळाच्या तीनही पैलूंवर काम करत आहोत.”

हेही वाचा: Sunil Gavaskar: विराट-रोहितच्या जागी तरुणांना का संधी देत नाहीत? गावसकरांचा संतप्त सवाल; म्हणाले, “विंडीजविरुद्ध धावा केल्याचा…”

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विराटने भारतीय फलंदाजीचे नेतृत्व करताना पहिल्या डावात आपले २९वे कसोटी शतक आणि ७६वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. विराटने ५५ महिन्यांनंतर परदेशी भूमीवर कसोटीत शतक झळकावले. त्याने शेवटचे शतक २०१८ मध्ये पर्थमध्ये केले होते. त्याचवेळी दुसऱ्या डावात रोहित, यशस्वी आणि इशान यांनी आक्रमक फलंदाजी करत भारताला चांगल्या लक्ष्यापर्यंत नेले. ३४ वर्षीय विराट आता वेस्ट इंडिजविरुद्ध २७ जुलैपासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेत खेळताना दिसणार आहे.