वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात करूण नायर याचा समावेश करण्यात आला नाही. यावरून निवड समितीवर प्रचंड टीका झाली. याबाबत आता कर्णधार विराट कोहली हा निवड समितीच्या बचावासाठी मैदानात उतरला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने निवड समिती आणि BCCIची बाजू मांडत आपले मत व्यक्त केले.
करुण नायर आणि इतर काही खेळाडू यांना वगळण्याबाबत त्याला पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला की मी संघाचा कर्णधार आहे. निवड समितीचा सदस्य नाही. त्यामुळे मी यावर भाष्य करणे योग्य आहे. निवड समितीच्या सदस्यांना त्यांचे काम माहिती आहे. ३ जणांची समिती चर्चा करून संघ कसा असावा याचा निर्णय घेतात. त्यामुळे त्याबाबत मी बोलणे बरोबर ठरणार नाही.
काही खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. तर काही खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे. निवड समितीला आपली भूमिका आणि काम माहिती आहे. संघातील काही निर्णयांबद्दल निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पण चाहते सर्व भूमिका एकत्र करतात. तसे करू नका, असेही विराट म्हणाला.
दोन कसोटी सामन्यांसाठी संघात पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, मोहम्मद सिराज या नवोदित खेळाडूंनी जागा देण्यात आली आहे. मात्र भारताचा कसोटी क्रिकेटमधला त्रिशतकवीर करुण नायर याला पुन्हा एकदा संघात जागा मिळवण्यात अपयश आले आहे. पण करुणला संघातून वगळण्याच्या निवड समितीच्या निर्णयाबद्दल करुण नायरशी सविस्तर बोललो असून त्याची संघात निवड का करण्यात आली नाही याची कारणं त्याला सांगितलेलं आहेत, अशी माहिती निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी दिली होती.