Rahul Dravid, IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची शानदार सुरुवात केली आणि पहिला सामना ५ गडी राखून जिंकला. आता त्यांना दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६ विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले आहे, ज्याचे मुख्य कारण संघातील दोन वरिष्ठ खेळाडू कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची अनुपस्थिती असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही खेळाडूंना विश्रांती देण्याच्या निर्णयाबाबत सामना संपल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी हा आशिया कपच्या तयारीचा भाग असल्याचे म्हटले.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी टीम इंडियाच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर सांगितले की, या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. जेणेकरून टीम इंडिया आशिया कपपूर्वी काही खेळाडूंबाबत निर्णय घेऊ शकेल. खरं तर, द्रविड म्हणतो की, “एन.सी.ए. मधील अनेक प्रमुख खेळाडू दुखापतीतून बाहेर पडत आहेत आणि त्यांच्या खेळण्याच्या दिवसांबद्दल अजूनही अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत, त्याला इतर खेळाडूंना सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार करण्यासाठी सामने खेळायला वेळ द्यायचा आहे.” बीसीसीआयने त्याचा हा व्हिडीओ त्यांच्या ट्वीटर हॅण्डलवर शेअर केला आहे.
वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६ विकेट्सने राखून पराभव स्वीकारावा लागला होता. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. भारताने २०१९ पासून वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामना गमावला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारताने प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजसमोर १८१ धावा केल्या. वेस्ट इंडिजने चार विकेट्सच्या मोबदल्यात १८२ धावा केल्या आणि सामना जिंकला.
राहुल द्रविडने मोठं गुपित उघड केलं
सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत राहुल द्रविड म्हणाला, “आम्ही वेगवेगळ्या खेळाडूंना आजमावत होतो. संघाला त्या युवा खेळाडूंना संधी द्यायची होती जेणेकरून सर्वात वाईट परिस्थितीतही त्यांच्याकडे खेळाचा थोडा का असेना अनुभव असेल. यामुळे आम्हाला आगामी काही काळात येणाऱ्या आशिया चषक आणि विश्वचषक या दोन मोठ्या टूर्नामेंटसाठी खेळाडू निवडण्याची अधिक संधी मिळेल. आशिया चषकापूर्वी आमच्याकडे या एकदिवसीय प्रकारच्या मालिकेत फक्त २-३ सामने आहेत. विराट आणि रोहित सतत खेळत आहेत हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे आम्ही आणखी पर्याय शोधत आहोत.”
द्रविड पुढे म्हणाला, “जर प्रामाणिकपणे सांगायचे तर, आम्हाला जास्त पर्याय मिळणार नाहीत, परंतु तुम्हाला माहित आहे की, आमचे अनेक महत्वाचे खेळाडू जखमी आहेत आणि ते एन.सी.ए.मध्ये सराव करत आहेत. अजूनही त्यांच्या खेळण्याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे आम्हाला आणखी काही खेळाडूंना संधी द्यायची आहे, जेणेकरून गरज पडल्यास ते खेळू शकतील.”
संघाला चांगली सुरुवात करण्याची संधी मिळाली नाही
वेस्ट इंडिजच्या कर्णधार होपने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने ५५ चेंडूत तेवढ्याच धावा केल्या आणि शुबमन गिल (३४ धावा, ४९ चेंडू) सोबत पहिल्या विकेटसाठी ९० धावा जोडून चांगली सुरुवात केली. पण ही भागीदारी तुटताच भारतीय संघाने पुढच्या ७.२ षटकांत २३ धावांत पाच विकेट्स गमावल्या. पावसामुळे दोन वेळा खेळात व्यत्यय आला पण वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी सुरूच ठेवली. वेस्ट इंडिजसाठी जरी १८२ धावांचे लक्ष्य फार मोठे नसले, तरी या खेळपट्टीवर हे लक्ष्य गाठणे सोपे नव्हते.