टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेप्रमाणे वेस्ट इंडीज विरुद्धच्या टी-२० मालिकेत विजयाने सुरुवात केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिला टी-२० सामना ७ चेंडू राखून जिंकला. रोहित शर्माने सर्वाधिक ४० धावा केल्या. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवनेही १८ चेंडूत ३४ धावांची शानदार खेळी केली. भारताने सामना जिंकला असला, तरी संघात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आणि यासाठी वेस्ट इंडीजचा कर्णधार कायरॉन पोलार्ड जबाबदार ठरला आहे.
कोलकाता येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या टी-२० दरम्यान, पोलार्डच्या दोन जोरदार फटक्यांमुळे दोन भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त झाले. त्यापैकी एकाला मैदानाबाहेर जावे लागले. दीपक चहर आणि अष्टपैलू व्यंकटेश अय्यर यांना दुखापत झाली. या सामन्यात पोलार्डने अवघ्या २४ धावा केल्या.
हेही वाचा – प्रो कबड्डी लीगचा अंतिम सामना २५ फेब्रुवारीला
या सामन्यानंतर बीसीसीआयकडून दोन्ही खेळाडूंच्या दुखापतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु दोघांचेही स्कॅनिंग केले जाईल आणि त्याच्या अहवालाच्या आधारे हे दोघे उर्वरित सामना खेळू शकतील की नाही याचा निर्णय घेतला जाईल. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी-२० सामना १८ फेब्रुवारी म्हणजेच शुक्रवारी होणार आहे.