भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात जमैकाच्या मैदानावर सुरु असलेल्या कसोटी सामन्यावर भारताने आपली मजबूत पकड बसवली आहे. वेस्ट इंडिजला विजयासाठी ४६८ धावांचं आव्हान दिल्यानंतर, भारताने तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस यजमानांच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडण्यात यश मिळवलं आहे. तत्पूर्वी हनुमा विहारी आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी खेळी करत भारताला दुसऱ्या डावात सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. हनुमा विहारीने दुसऱ्या डावात नाबाद ५३ तर रहाणेने नाबाद ६४ धावांची खेळी केली. जमैका कसोटीच्या पहिल्या डावातही हनुमा विहारीने १११ धावांची खेळी केली होती.

या अनोख्या कामगिरीसह हनुमा विहारीने सचिन तेंडुलकरच्या कामगिरीशी बरोबरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन एका डावात शतक आणि एका डावात अर्धशतक झळकावणारा हनुमा विहारी दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकरने इंग्लंडविरुद्ध १९९० साली मँचेस्टर कसोटीमध्ये अशी कामगिरी केली होती.

दरम्यान, प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या विंडीजच्या क्रेग ब्रेथवेटला इशांत शर्माने यष्टीरक्षक पंतकडे झेल द्यायला भाग पाडलं. यानंतर कॅम्पबेल आणि ब्राव्हो यांची छोटेखानी भागीदारी रंगली. यानंतर विराट कोहलीने तात्काळ मोहम्मद शमीला गोलंदाजी देत, विंडीजला धक्का दिला. शमीने कॅम्पबेलला कर्णधार विराट कोहलीच्या हाती झेल द्यायला भाग पाडत विंडीजला दुसरा धक्का दिला. अखेरीस तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विंडीजने ४५ धावांपर्यंत मजल मारली होती. हा सामना जिंकण्यासाठी विंडीजला अजुनही ४२३ धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे चौथ्या दिवसाच्या खेळात विंडीजचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा कसा सामना करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader