भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. वन-डे आणि टी-२० मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेतही बाजी मारण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. कसोटी क्रमवारीतलं पहिलं स्थान कायम राखण्यासाठी भारताला या मालिकेत विजय मिळवणं गरजेचं आहे. या मालिकेत कुलदीप यादव हाच भारताचा पहिल्या पसंतीचा फिरकीपटू असावा, असं मत हरभजन सिंहने व्यक्त केलं आहे.
“सध्याच्या कामगिरीचा विचार केला तर माझ्यामते कसोटी मालिकेत कुलदीप यादव हाच पहिल्या क्रमांकाचा फिरकीपटू असला पाहिजे. डावखुऱ्या फलंदाजांविरोधात कुलदीप चांगले चेंडू वळवतो, तसेच त्याच्याकडे विकेट घेण्याचीही क्षमता आहे. रविंद्र जाडेजालाही संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. मात्र केवळ विंडीजविरुद्धची मागच्या कामगिरीचा निकष धरायचं ठरवलं तर आश्विनला संघात जागा मिळू शकते.” टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत हरभजन बोलत होता.
२०१८ साली भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यात रविचंद्रन आश्विनला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. ज्या खेळपट्टीवर मोईन अलीसारख्या कामचलाऊ गोलंदाजाचे चेंडू वळत होते, त्याच खेळपट्टीवर आश्विन अपयशी ठरला होता. यानंतर वर्षभराच्या काळात आश्विनने काऊंटी क्रिकेटमध्ये उतरत आपली कामगिरी सुधारली आहे, त्यामुळे पहिल्या सामन्यात आश्विनला संघात जागा मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.