विंडीजविरुद्धचा पहिला टी२० सामना भारताने ५ गडी राखून जिंकला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानावर झाला. सामन्याच्या आधी प्रथेप्रमाणे या स्टेडियममधील घंटा वाजवून सामन्याला सुरुवात करण्यात आली. फिक्सिंगच्या आरोपांमुळे क्रिकेट सोडावे लागलेल्या भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याला ही घंटा वाजवून सामना सुरु करण्याचा मान मिळाला. पण ही बाब भारतीय फलंदाज गौतम गंभीरला रुचली नाही.

माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याला १९९९ च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान मॅच आणि स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमुळे क्रिकेट सोडावे लागले. संबंधित आरोपात तथ्य असल्याचेही नंतर समोर आले. असे असतानाही एका भ्रष्टाचारी माणसाला हा मान कसा कसा काय देण्यात आला? असा सवाल गंभीरने ट्विट केला.

भारत जरी सामना जिंकला असेल, तरी मला एका गोष्टीबाबत वाईट वाटत आहे. भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी लोकांबद्दल BCCIची प्रशासकीय समिती CoA आणि बंगाल क्रिकेट संघटना यांची काही ठोस भूमिका दिसत नाही. क्रिकेट संघटनांच्या निवडणुकांमध्ये त्याला (अझरला) उमेदवारी मिळाली हे ठीक होते, पण हा मान मिळणे हे खूपच धक्कादायक आहे, असे ट्विट त्याने केले आहे.

दरम्यान, या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या माऱ्यापुढे विंडीजचे फलंदाज २० षटकात केवळ १०९ धावाच करू शकले. या माफक आव्हानाचा बचाव करताना विंडीजने उत्तम गोलंदाजी केली. पण दिनेश कार्तिकने उपयुक्त खेळी करताना भारताला ५ विकेट राखून विजय मिळवून दिला.

Story img Loader