West Indies vs India 4th T20I Live Update: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी२० मालिकेतील उर्वरित दोन सामने लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळवले जात आहेत. १२ आणि १३ ऑगस्टला सलग दोन दिवस होणारे सामने सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. चौथ्या टी२० सामन्यात भारताचे सलामीवीर फलंदाज शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांना अक्षरशः धुतले, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. दोघांनी तुफानी आपापली अर्धशतके झळकावत भारताला ९ विकेट्सने विंडीजचा धुव्वा उडवला. पहिल्या विकेटसाठी तब्बल १६५ धावांची विक्रमी भागीदारी करत टीम इंडियाला सहजरीत्या सामना जिंकवून दिला. या विजयाने मालिकेत भारताने २-२ अशी बरोबरी केली. यशस्वी जैस्वालला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
भारताने शनिवारी (१२ ऑगस्ट) पाच टी२० मालिकेतील चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा नऊ गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. आता पाचवा आणि निर्णायक सामना रविवारी होणार आहे. मालिकेत एका क्षणी २-०ने पिछाडीवर असताना, भारतीय संघाने तिसऱ्या आणि चौथ्या टी२०मध्ये शानदार पुनरागमन करून वेस्ट इंडिजला मालिकेत अजिंक्य आघाडी घेण्यापासून रोखले. आता अंतिम सामना जिंकून मालिका खिशात घालण्याकडे टीम इंडियाचे लक्ष असेल.
या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संघाने २० षटकांत आठ गडी बाद १७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने १७ षटकांत एक विकेट गमावून १७९ धावा करत सामना जिंकला. यशस्वी जैस्वालने ५१ चेंडूत ८४ धावा केल्यानंतर शेवटपर्यंत नाबाद राहिली. तिलक वर्माने पाच चेंडूंत नाबाद सात धावा केल्या. यशस्वीने आपल्या खेळीत ११चौकार आणि तीन षटकार मारले.
यशस्वी आणि शुबमन यांनी शतकी भागीदारी केली
१७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारी केली. दोघांनी पहिल्यांदाच टी२० मध्ये शतकी भागीदारी केली आहे. भारताला पहिला धक्का शुबमन गिलच्या रूपाने बसला. १६व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रोमॅरियो शेफर्डने गिलला बाद केले. गिल ४७ चेंडूत ७७ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि पाच षटकार मारले.
अर्शदीपने पहिला धक्का दिला
तत्पूर्वी, वेस्ट इंडिजचा कर्णधार पॉवेलचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने चुकीचा ठरवला होता. डावाच्या दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने सलामीवीर काइल मेयर्सला (१७) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. चौकाराच्या प्रयत्नात मेयर्सला यष्टिरक्षक संजू सॅमसनने झेलबाद केले. यानंतर विंडीज संघाने तीन धावांत तीन विकेट गमावल्या.
पूरन आणि पॉवेल प्रत्येकी एका धावेवर बाद
पॉवरप्लेच्या शेवटच्या सहाव्या षटकात अर्शदीपने दुसरा सलामीवीर ब्रेंडन किंगला (१८) कुलदीपकडे झेलबाद केले. त्यानंतर सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कुलदीपने निकोलस पूरनला बाद करून संघाला मोठी विकेट मिळवून दिली. पूरनला केवळ एकच धाव करता आली. कुलदीपच्या षटकातील हा पहिलाच चेंडू होता. यानंतर त्याने त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर कॅप्टन पॉवेलला (०१) बाद करून विंडीज संघाला चौथा धक्का दिला.
हेटमायर आणि शाई होप वेस्ट इंडिजची धुरा सांभाळली
चार गडी बाद करत अनुभवी फलंदाज शाई होपने स्फोटक शिमरॉन हेटमायरसह संघाची धुरा सांभाळली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. होपचे अर्धशतक हुकले आणि २९ चेंडूत ४५ धावा केल्यानंतर तो युजवेंद्र चहलचा बळी ठरला. रोमारिया शेफर्ड आणि जेसन होल्डर यांनी फलंदाजी केली नाही. शेफर्ड नऊ धावा आणि मुकेश कुमार तीन धावा करून अक्षर पटेलचा बळी ठरला.
हेटमायर आणि स्मिथने वेस्ट इंडिजला १७० धावांच्या पुढे नेले
१२३ धावांवर सात विकेट पडल्यानंतर हेटमायरला ओडेन स्मिथने साथ दिली. दोघांनी शेवटच्या षटकात झटपट धावा काढल्या आणि ४४ धावांची भागीदारी केली. हेटमायरने ३९ चेंडूत ६१ धावांची धडाकेबाज खेळी खेळली. त्याने तीन चौकार आणि चार षटकार मारले. अर्शदीप सिंगने हेटमायरला तिलक वर्माकरवी झेलबाद केले. स्मिथने १२ चेंडूत १५तर अकिल हुसेनने दोन चेंडूत पाच धावा केल्या.
अर्शदीप आणि कुलदीपची उत्कृष्ट गोलंदाजी
भारताकडून या सामन्यात अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांनी शानदार गोलंदाजी केली. अर्शदीपने तीन विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याने वेस्ट इंडिजचे दोन्ही सलामीवीर काइल मेयर्स आणि ब्रेंडन किंग तसेच शिमरॉन हेटमायर यांना बाद केले. अर्शदीपने चार षटकांत ३८ धावा दिल्या. कुलदीप यादवने निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल या दोन धोकादायक फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवताना मधल्या फळीचा कहर केला. त्याने चार षटकात केवळ २६ धावा दिल्या. अक्षर पटेल, युजवेंद्र चहल आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक यश मिळाले.