IND vs WI : विंडीजविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना भारताने ८ गडी राखून जिंकला. रोहित शर्माचे दीडशतक आणि कर्णधार विराट कोहलीचे शतक(१४०) यांच्या जोरावर भारताने ३२३ धावांचे लक्ष्य सहज पार केले. भारताने या विजयासह पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम विंडीजला फलंदाजीस आमंत्रित केले. शिमरॉन हेटमायरचे झंझावाती शतक आणि कायरन पॉवेलचे अर्धशतक याच्या जोरावर विंडीजने ५० षटकात ८ बाद ३२२ धावा केल्या आणि भारतापुढे ३२३ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन ४ धावांवर बाद झाला. पण रोहित आणि विराट यांनी तडाखेबाज खेळ केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २४६ धावांची भागीदारी केली. विराट १४० धावांवर बाद झाल्यानंतरही रोहितने आपला झंझावात सुरूच ठेवला. विजयासाठी २ धावा आवश्यक असताना त्याने षटकार लगावत आपले दीडशतक (१५२*) पूर्ण केले. रायुडूने २२ धावांची उपयुक्त खेळी केली. या दोघांनी नाबाद ७० धावांची भागीदारी केली. थॉमस आणि बिशू यांनी १-१ बळी टिपला.
त्याआधी विंडीजची सुरुवात खराब झाली. चंद्रपॉल हेमराज ९ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर कायरन पॉवेलने अर्धशतक ठोकले आणि डावाला आकार दिला. तो ५१ धावांवर बाद झाला. २००वा एकदिवसीय सामना खेळणारा अनुभवी सॅम्युअल्स शून्यावर बाद झाला. मात्र हेटमायरने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ७४ चेंडूत १०६ धावा केल्या. शाय होप (३२), आर पॉवेल (२१) आणि कर्णधार जेसन होल्डर (३८) हे तिघे वगळता इतर फलंदाजांना आपली छाप उमटवता आली नाही. पण शेवटच्या जोडीने मात्र भारताला रडवले. देवेंद्र बिशू (२२) आणि केमार रोच (२६) या दोघांनी नाबाद ४४ धावांची भागीदारी करून विंडीजला ३२२ या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. भारताकडून चहलने ३, शमी व जाडेजाने २-२ आणि खलील अहमदने १ गडी टिपला.