IND vs WI Test 2023 2nd Test Highlights: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीत पाऊस खलनायक ठरला. पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथील कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. शेवटच्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही. अशा स्थितीत भारताने जवळपास जिंकलेली कसोटीवर पाणी सोडावे लागले. टीम इंडियाला अनिर्णितवर समाधान मानावे लागले. भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली. रोहित ब्रिगेडने डॉमिनिका येथील पहिली कसोटी एक डाव आणि १४१ धावांनी जिंकली होती. दुसरी कसोटी अनिर्णीत राहिल्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५च्या नवीन चक्रातील गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसऱ्या कसोटीत भारताने वेस्ट इंडिजसमोर ३६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. रविवारचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजच्या २ बाद ७६ धावा झाल्या होत्या. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी त्याला २८९ धावांची गरज होती. त्याचवेळी भारताला विजयासाठी आठ विकेट्सची गरज होती. मात्र, एकही खेळ होऊ शकला नाही. अशा स्थितीत भारताला १-० वर समाधान मानावे लागले. त्यामुळे पावसाने वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप होण्यापासून वाचवले.

भारताने पहिल्या डावात ४३८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव २५५ धावांवर आटोपला. अशा स्थितीत टीम इंडियाला १८३ धावांची आघाडी मिळाली. भारताने दुसरा डाव २ बाद १८१ धावांवर घोषित केला आणि एकूण ३६४ धावांची आघाडी घेतली. अशाप्रकारे वेस्ट इंडिजला ३६५ धावांचे लक्ष्य मिळाले. तसेच भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ही १००वी कसोटी होती.

हेही वाचा: Rohit Sharma: “हिटमॅनला वडापाव नाही मिळाला…”, दुसऱ्या कसोटी दरम्यान रोहितचा मजेशीर Videoवर, चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस

वेस्ट इंडिजवर भारताचा सलग नववा कसोटी मालिका विजय

भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची सलग नववी कसोटी मालिका जिंकली आहे. टीम इंडियाचा शेवटचा पराभव २००२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत झाला होता. त्यानंतर विंडीजने भारताला त्यांच्या घरच्या मैदानावर २-१ ने पराभूत केले होते. यानंतर टीम इंडियाने नऊ मालिका जिंकल्या आहेत. त्याचबरोबर वेस्ट इंडिजच्या मैदानावर टीम इंडियाचा हा सलग पाचवा कसोटी मालिका विजय आहे. भारताने २०१९ मध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका २-०, २०१६ मध्ये चार सामन्यांच्या मालिकेत २-०, २०११ मध्ये तीन सामन्यांच्या मालिकेत १-० आणि २००६ मध्ये चार सामन्यांची मालिका १-० ने जिंकली होती.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत टीम इंडियाचे नुकसान

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नवीन चक्रातील (२०२३-२५) ही भारताची पहिली कसोटी मालिका होती. पहिली कसोटी जिंकून भारताचे १२ गुण झाले. एक कसोटी जिंकल्यास संघाला १२ गुण मिळतात आणि बरोबरीत सुटल्यास सहा गुण मिळतात आणि अनिर्णित राहिल्यास चार गुण मिळतात. अशा स्थितीत शेवटच्या दिवशी पावसाचा सर्वाधिक फटका भारताला बसला, कारण संघाला वेस्ट इंडिजबरोबर चार गुण शेअर करावे लागले. जर शेवटच्या दिवशी खेळ झाला असता आणि भारताने विंडीजला ऑल आऊट करून दुसरी कसोटी जिंकली असती तर टीम इंडियाला १२ गुण मिळाले असते. अशा परिस्थितीत, WTCच्या या फेरीत भारताचे एकूण गुण २४ झाले असते आणि त्यामुळे टीम इंडियाला आणखी मदत झाली असती. मात्र, हे होऊ शकले नाही.

हेही वाचा: IND vs WI 2nd Test: दुसऱ्या कसोटी सामन्यात पाऊस ठरला व्हिलन! टीम इंडियाने १-०ने मालिका घातली खिशात

या अनिर्णीत कसोटीसह, भारत आता डब्ल्यूटीसी २०२३-२५ ​​चक्रातील गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांची गुणांची टक्केवारी ६६.६७ आणि गुण १६ आहेत. त्याचवेळी पाकिस्तानने १०० गुणांच्या टक्केवारीसह एक विजय आणि १२ गुणांसह पहिले स्थान गाठले. ऑस्ट्रेलिया २६ गुण आणि ५४.१७ गुणांच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच, इंग्लंड १४ गुणांसह २९.१७ टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे. गुणांच्या तक्त्यामध्ये गुणांच्या टक्केवारीला महत्त्व दिले जाते. अशा प्रकारे संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. पाकिस्तान संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. त्यांनी पहिली कसोटी जिंकली असून जर दुसरी कसोटीही जिंकली तर ते भारतापेक्षा खूप पुढे जातील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi india won ninth consecutive test series from west indies draw in second match resulted in loss in wtc avw