India vs West Indies 2nd Test: भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी फटके मारण्याचा प्रयत्नही केला नाही अशी टीका केली आणि त्यांच्या फलंदाजी तंत्राबाबतही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, त्यांनी दुसऱ्या कसोटीसाठी वापरल्या जाणाऱ्या खेळपट्टीबाबत भाष्य केले आहे. त्यांच्या मते फलंदाजीसाठी ही खेळपट्टी खूप संथ होती त्यामुळे या ठिकाणी धावा या करणे फारसे अवघड काम नव्हते. दोन सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिज सध्या ०-१ ने पिछाडीवर आहे. दुसऱ्या कसोटीत भारताच्या ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवशी धावा करण्यासाठी आलेला विंडीज अवघ्या अर्ध्या तासात सर्वबाद झाला, त्यांनी फारसे असे विशेष प्रयत्न देखील केले नाहीत.
वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात दोन गडी बाद ७६ धावा केल्या असून विजयासाठी अजून त्यांना २८९ धावांची गरज आहे. त्याचवेळी टीम इंडिया विजयापासून आठ विकेट्स दूर आहे. भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हांबरे म्हणाले, “खेळपट्टी अतिशय संथ होती त्यामुळे इथे फलंदाजी करणे खूप सोपे आहे. दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यात थोडी फिरकीपटूंना अधिक मदत मिळू लागली होती. वेस्ट इंडिजने फलंदाजीत अत्यंत बचावात्मक दृष्टिकोन स्वीकारला. फलंदाज जेव्हा शॉट खेळायचा प्रयत्न करतो तेव्हा विकेट घेण्याचीही संधी असते पण त्याने तसा प्रयत्न केला नाही. त्यांनी शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाच नाही म्हणूनच त्यांची धावसंख्या ३०० पार होऊ शकली नाही. किमान ब्रॅथवेटने तरी एका बाजूने शतकी खेळी करणे आवश्यक होते कारण, तो एकमेव फलंदाज होता ज्याने सर्वात जास्त धावा केल्या आहेत.”
जेव्हा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कॅरेबियन संघाने पाच विकेट्सच्या मोबदल्यात २२९ धावा केल्या होत्या आणि चौथ्या दिवशी खेळाला सुरुवात होतात २६ धावांत उर्वरित पाच विकेट्स पडल्या. त्यामुळे भारताला १८३ धावांची भक्कम आघाडी मिळाली. भारताने अवघ्या २४ षटकांत १८१ धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला आणि वेस्ट इंडिजला पुन्हा फलंदाजीला आमंत्रित केले.
सिराजच्या भेदक गोलंदाजीपुढे भारताने रविवारी ७.४ षटकांत वेस्ट इंडिजचे उर्वरित पाच विकेट्स बाद केले. वेस्ट इंडिजचा संघ शनिवारच्या धावसंख्येमध्ये केवळ २६ धावाच जोडू शकला. रविवारी वेस्ट इंडिजला पहिला झटका अॅलिक अथानाजच्या रूपाने बसला. त्याला नवोदित मुकेशने एलबीडब्ल्यू आऊट केले. अथनाजेला ३७ धावा करता आल्या.
यानंतर सिराजचा जलवा पाहायला मिळाला, त्याने उर्वरित चार विकेट्स घेत विंडीजचा डाव २५५ धावांत आटोपला. त्याने जेसन होल्डर (१५), अल्झारी जोसेफ (४), केमार रोच (४) आणि शॅनन गॅब्रिएल (०) यांना बाद केले. जोमेल वॅरिकन ७ धावा करून नाबाद राहिला. भारताकडून मोहम्मद सिराजने पाच विकेट्स घेतल्या. त्याचवेळी मुकेश कुमार आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आणि अश्विनने एक विकेट घेतली.
टीम इंडियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना एका डावाने जिंकला आणि दुसऱ्या सामन्यातही विजयाच्या मार्गावर आहे. दोन्ही संघांमधील हा १००वा कसोटी सामना असून तो जिंकून भारतीय संघाला तो संस्मरणीय बनवायचा आहे.