India vs West Indies, Bazball Cricket: भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इतिहास रचला. सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताने वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांवर तुटून पडत अतिशय आक्रमक पद्धतीने धावा केल्या. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी झंझावाती अर्धशतके ठोकली आणि टीम इंडियाने अवघ्या २४ षटकांत १८१ धावा करत डाव घोषित केला. या डावात भारताचा धावगती ७.५४ होती. २० षटकांच्या किंवा त्याहून अधिक षटकांच्या एका डावात कसोटी क्रिकेटमधील हा सर्वाधिक धावांचा रनरेट आहे.
इंग्लंडच्या बझबॉलला मागे टाकत भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमधील एका डावात सर्वाधिक कसोटी डावात धावांचा विक्रम केला. भारतीय क्रिकेट संघाने त्यांच्या दुसऱ्या डावात ७.५४च्या धावगतीने २ गडी गमावून १८१ धावा केल्या. यानंतर भारताने डाव घोषित केला. १४६ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणताही संघ एवढ्या स्ट्राइक रेटने धावा करू शकला नाही. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता, ज्यांनी पाकिस्तानविरुद्ध ७च्या धावगतीने आणि ५३च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.
सध्या कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजीसाठी इंग्लंड संघाची बझबॉल शैली खूप चर्चेत आहे. अशा स्थितीत भारतीय संघाने इंग्लंडपेक्षा आक्रमक खेळ दाखवत विश्वविक्रम केला असून ही ‘ड्रॉबॉल’ची पहिली झलक मानली जात आहे. विशेष बाब म्हणजे आपल्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये संथ फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदाखाली टीम इंडियाने हा विक्रम केला आहे.
भारताने विश्वविक्रम केला
या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला. कांगारू संघाने २०१७ मध्ये सिडनी येथे पाकिस्तानविरुद्ध केवळ ३२ षटकांत २४१/२ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियन संघाने ७.५३च्या धावगतीने या धावा केल्या. त्याचवेळी भारताचा धावगती ७.५४ होता. या डावात टीम इंडिया कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० धावा करणारा संघ बनला आणि तसेच, आपल्या सर्वात जलद ५० धावाही पूर्ण केल्या. भारतीय संघाने दुसऱ्या डावात ५.३ षटकात विकेट न गमावता ५० धावा केल्या. हे भारतीय संघाचे कसोटीतील सर्वात जलद अर्धशतक आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारतासाठी डावाची सुरुवात केली आणि केवळ ७१ चेंडूंमध्ये म्हणजे ११.५ षटकांत ९८ धावांची भागीदारी केली. रोहित बाद झाल्यानंतर भारताने केवळ १२.२ षटकांत म्हणजे ७४ चेंडूत १०० धावांचा टप्पा पार केला.
श्रीलंकेचा विक्रमही मोडला
भारताने श्रीलंकेचा २२ वर्षे जुना विक्रम मागे टाकला. २००१च्या आशियाई कसोटी चॅम्पियनशिपमध्ये श्रीलंकेच्या संघाने बांगलादेशविरुद्ध केवळ १३.२ षटकांत ८० चेंडूत १०० धावांचा टप्पा गाठला होता. भारताच्या या डावात मुंबई इंडियन्सचे दोन स्टार इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी सर्वात आक्रमक फलंदाजी केली. रोहित शर्माने कसोटी कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. आपल्या टी२० अवतारात फलंदाजी करताना रोहितने अवघ्या ३५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेले संघ:
७.५४ – १८१/२d – भारत विरुद्ध वेस्ट इंडीज, पोर्ट ऑफ स्पेन, २०२३
७.५३ – २४१/२d – ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, सिडनी, २०१७
७.३६ – २६४/७d – इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, रावळपिंडी, २०२२
६.८२ – १७३/६ – वेस्ट इंडीज विरुद्ध भारत, किंग्स्टन, १९८३
६.८० – ३४०/३d – दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे, केप टाउन, २००५