WI Indian team leaves for West Indies for ODI and T20 series: सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना खेळत आहे. यानंतर दोघांमध्ये एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी भारताचे अनेक स्टार खेळाडू वेस्ट इंडिजला रवाना झाले आहेत. यामध्ये फलंदाज सूर्यकुमार यादव, फिरकी गोलंदाज कुलदीप यादव, वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि आयपीएल स्टार तिलक वर्मा यांचा समावेश होता.
सूर्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे फिरकीपटू कुलदीप यादवसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोन्ही खेळाडू विमानात असल्याचे दिसत आहेत. या फोटोनंतर त्याने स्टोरीच्या माध्यमातून बार्बाडोसला पोहोचल्याची माहितीही शेअर केली आहे. याशिवाय जम्मू एक्स्प्रेसच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या उमरान मलिकनेही त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो विमानाच्या आत बसलेला दिसत होता.
यानंतर उमरानने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून बार्बाडोसला पोहोचल्याची माहिती दिली. याशिवाय स्टार फलंदाज तिलक वर्माने त्याच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या कुटुंबासह दिसत आहे. तिलकच्या या फोटोत किट बॅग आणि इतर सामानही ठेवलेले दिसत होते.
वनडेमध्ये रोहित शर्मा आणि टी-२०मध्ये हार्दिक पांड्या करणार नेतृत्व –
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर टी-२० मालिकेत हार्दिक पांड्या भारताचे नेतृत्व करणार आहे. विशेष म्हणजे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. २७ जुलै, गुरुवारपासून एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर टी-२० मालिका ३ ऑगस्ट, गुरुवारपासून खेळवली जाणार आहे. टी-२० मालिका आणि या दौऱ्यातील शेवटचा सामना १३ ऑगस्ट रोजी रविवारी होणार आहे.
भारताचा एकदिवसीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकटमोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.
भारताचा टी-२० संघ –
इशान किशन (यष्टीरक्षक), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.