विंडीजविरुद्ध टी-२० आणि वन-डे मालिकेतही वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघाने अँटीग्वा येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यावर आपलं वर्चस्व राखलं आहे. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारताने ३ गडी गमावत १८५ धावांपर्यंत मजल मारली आहे. सध्याच्या घडीला भारताकडे २६० धावांची भक्कम आघाडी आहे. वेस्ट इंडिजचा पहिला डाव २२२ धावांवर गारद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. इशांत शर्माने वेस्ट इंडिजचा निम्मा संघ गारद केला. त्याला मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी २-२ तर जसप्रीत बुमराहने १ बळी घेत चांगली साथ दिली. यादरम्यान इशांत शर्माने अनोख्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
पहिल्या डावात इशांत शर्माने विंडीजच्या क्रेग ब्रेथवेट आणि शेमरॉन हेटमायर यांना आपल्याच गोलंदाजीवर झेल घेत माघारी धाडलं. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात अशी कामगिरी करणारा इशांत दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी २००६ साली मोहाली कसोटीमध्ये पदार्पण करणाऱ्या मुनाफ पटेलने इंग्लंडच्या केविन पिटरसन आणि अँड्रू फ्लिंटॉफला आपल्याच गोलंदाजीवर झेल घेत माघारी धाडलं होतं. यानंतर तब्बल १३ वर्षांनी इशांतने या अनोख्या कामगिरीशी बरोबरी साधली आहे.
Ishant Sharma:
c & b KC Brathwaite
c & b SO HetmyerIshant is only the 2nd Indian pacer to take two wickets via “caught & bowled” in a Test inning
Munaf Patel had two ‘c & b’ in his debut inns. (Mohali 2006)
His 1st two victims -> KP Pietersen & A Flintoff via ‘c & b’#WIvIND— Sampath Bandarupalli (@SampathStats) August 24, 2019
दरम्यान, पहिल्या डावाच्या तुलनेत भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात आश्वासक खेळ केला. तरीही सलामीवीर मयांक अग्रवालला झटपट माघारी धाडण्यात विंडीज यशस्वी ठरलं. फिरकीपटू रोस्टन चेसने त्याला पायचीत करत माघारी धाडलं. यानंतर लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र ठराविक अंतराने ते ही माघारी परतले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने भारताचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी मोठे फटके खेळण्याचा मोह टाळत खेळपट्टीवर स्थिरावण्याकडे भर दिला. ज्याचा फायदा भारतीय संघाला झालेला पहायला मिळाला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली नाबाद ५१ तर अजिंक्य रहाणे नाबाद ५३ धावांवर खेळत होता. वेस्ट इंडिजकडून दुसऱ्या डावात आतापर्यंत रोस्टन चेसने २ तर केमार रोचने १ बळी घेतला.