विंडीजविरुद्धच्या शेवटच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी गुरुवारी संघाची घोषणा करण्यात आली. या संघात अनुभवी केदार जाधवला संघात नाही. या गोष्टीचा केदारला चांगलाच धक्का बसला असून मला संघात का घेण्यात आले नाही, याची मला कल्पना नाही. मला कोणतीही पूर्वकल्पना न देता संघातून वगळण्यात आलं आहे, असे केदार जाधवने सांगितले.
निवड समितीशी या संदर्भात काही चर्चा झाली का? असे केदारला विचारण्यात आले होते. त्यावर केदार म्हणाला की माझी संघात निवड झालेली नाही, हे मला माहिती नव्हते. मला हे तुम्हां प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींकडूनच समजते आहे. संघातून मला वगळण्यामागे कोणते कारण आहे, हे मलादेखील जाणून घ्यायचे आहे. पण सध्या मी रणजी करंडकात खेळण्याकडे लक्ष केंद्रित करणार आहे.
दरम्यान, निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दुखापतीमुळेच केदारला संघात स्थान देण्यात आले नाही, असे सांगितले असल्याने याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. ‘केदारच्या तंदुरुस्तीच्या अनेक समस्यांमुळेच आम्ही त्याला संघात जागा दिली नाही. कित्येक वेळा त्याने संघात पुनरागमन केले आहे, मात्र स्पर्धेदरम्यानच त्याच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढलेले आपण पाहिले आहे. आशिया चषकातसुद्धा हेच घडले’, असे प्रसाद यांनी केदारला वगळण्याच्या निर्णयाविषयी स्पष्टीकरण दिले आहे.