भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा डाव ४३.५ षटकांत १७६ धावांवर आटोपला. वेस्ट इंडिजकडून माजी कर्णधार जेसन होल्डरने ५७ धावा केल्या. भारताकडून यजुर्वेंद्र चहलने चार आणि वॉशिंग्टन सुदारने तीन बळी घेतले. याशिवाय मोहम्मद सिराज एक विकेट घेण्यात यशस्वी ठरला. सिराजने भारताला पहिले यश मिळवून दिले होते. भारताच्या वेगवान गोलंदाजाने शाई होपला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. खरे तर सिराजने ज्या षटकात होपला बाद केले, त्या षटकात होरने सिराजला २ चौकार मारले. मात्र यानंतर सिराजने आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण राखले आणि अखेर होपला बाद करून त्याचा बदला घेतला.
होपला बाद केल्यानंतर सिराजने पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ट्रेडमार्क ‘SIUU ‘ सेलिब्रेशन केले. गोल केल्यानंतर, रोनाल्डो असेच सेलिब्रेशन करतो. सिराजच्या या सेलिब्रेशनवर चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत. स्पॅनिशमध्ये ‘Siuu’ चा अर्थ ‘होय’ असा होतो. या सामन्यात सिराजने ८ षटकात २६ धावा देत एक विकेट घेतली.
हेही वाचा – IND vs WI 1st ODI : …म्हणून टीम इंडियाच्या खेळाडूंनी दंडावर बांधली काळी पट्टी!
विंडीजकडून अष्टपैलू जेसन होल्डरने अर्धशतक झळकावले. होल्डरने ७१ चेंडूत ५७ तर फॅबियन ऍलनने ४३ चेंडूत २९ धावा केल्या. डॅरेन ब्राव्हो आणि निकोलस पूरन यांनी प्रत्येकी १८ धावा केल्या.