IND vs WI : भारत विरुद्ध विंडीज दुसऱ्या कसोटीचा तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव ३६७ धावांत संपुष्टात आला आणि उपहाराची विश्रांती घेण्यात आली. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने पाच बळी घेत भारताचा डाव लवकर संपवला. मधल्या फळीने भारताला निराश केले. पण मुंबईकर शार्दुल ठाकूरच्या साथीने अश्विनने भारताला ३५० धावांचा टप्पा गाठून दिला. या वेळी दुखापतग्रस्त असूनही संघासाठी शार्दुल मैदानात फलंदाजीसाठी उतरल्यामुळे त्याचे कौतुक करण्यात आले.
भारताची धावसंख्या ९ बाद ३३९ इतकी होती. दुखापतीमुळे भारताचा शेवटचा गडी शार्दुल फलंदाजीसाठी येणार का? याबाबत साशंकता होती. पण शार्दुल स्वतः मैदानात आला आणि साऱ्यांनी त्याचे टाळ्या वाजवून कौतुक केले. त्यानंतर अश्विन आणि शार्दुल दोघांनी मिळून भारताला ३५० धावांचा टप्पा गाठून दिला. शार्दुलने यात १२ चेंडूत ४ धावा केल्या.
View this post on Instagram
@shardul_thakur shows great grit and walks out to bat #TeamIndia #INDvWI
त्याआधी काल दुसऱ्या दिवसअखेर भारताने ४ बाद ३०८ धावांपर्यंत मजल मारली होती. त्या धावसंख्येवरून आज खेळाला सुरूवात झाली. दिवसाच्या सुरुवातीच्या खेळात कर्णधार जेसन होल्डर याने एकाच षटकात खेळपट्टीवर स्थिरावलेला अजिंक्य रहाणे (८०) आणि रवींद्र जाडेजा (०) याला बाद केले. विशेष म्हणजे हे षटक निर्धाव टाकण्यात त्याला यश आले. त्यानंतर ऋषभ पंत ९२ धावांवर बाद झाला. पाठोपाठ कुलदीप यादव (६) आणि उमेश यादव (२) धावांवर बाद झाला. पण अश्विनने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत भारताला साडेतीनशे पार मजल मारून दिली. अखेर गब्रीएलने अश्विनचा ३५ धावांवर त्रिफळा उडवला. भारताकडून पृथ्वी शॉ, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांनी चांगली कामगिरी केली. कोहली वगळता तीनही खेळाडूंनी अर्धशतक ठोकले.