India vs West Indies 1st ODI: पावसामुळे टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळू शकला नाही, पण रोहित शर्माचे खेळाडू गुरुवारपासून (२७ जुलै) सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत त्यावर मात करण्याचा प्रयत्न करतील. कसोटीप्रमाणेच एकदिवसीय क्रिकेटमध्येही टीम इंडियाचे वेस्ट इंडिजवर प्रदीर्घ काळापासून वर्चस्व आहे. विंडीजने शेवटची वन डे मालिका २००६ मध्ये भारताविरुद्ध जिंकली होती. त्यानंतर भारताने विंडीजविरुद्ध सलग १२ एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत. आता रोहित ब्रिगेडचे लक्ष्य सलग १३वी वन डे मालिका जिंकण्यावर असेल.
भारतात आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता गमावल्यानंतर वेस्ट इंडिजला त्यांच्या ५० षटकांच्या सामन्यात सुधारणा करावी लागेल. २७ जुलैपासून सुरू होणार्या मालिकेतील पहिले दोन सामने बार्बाडोसच्या किंगस्टन ओव्हलवर खेळवले जातील. यानंतर, दोन्ही संघ १ ऑगस्टला त्रिनिदादला जातील, जिथे तिसरा एकदिवसीय सामना ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत खेळवला जाईल. वन डे मालिकेनंतर टीम इंडियाला पाच टी२० सामन्यांची मालिकाही खेळायची आहे.
कशी असेल किंग्स्टन ओव्हल खेळपट्टी?
किंग्स्टन ओव्हलची पारंपारिक खेळपट्टी ही गोलंदाजीला साथ देते. ही खेळपट्टी थोडी संथ आहे आणि वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकीपटूंना अधिक अनुकूल आहे. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २२९ आहे. मात्र, येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने ३०२ धावांचे लक्ष्य १७ चेंडू शिल्लक असताना आणि ५ गडी राखून पूर्ण केले होते. टीम इंडियाने या मैदानावर एकूण तीन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. भारताने एक सामना जिंकला असून दोन गमावले आहेत. मात्र, दोन दशकांपूर्वी २००२ मध्ये टीम इंडियाने येथे शेवटचा वन डे खेळला होता.
येथे एकूण ४९ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २२ सामने जिंकले आहेत, तर पाठलाग करणाऱ्या संघाने २५ सामने जिंकले आहेत. मात्र, येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या १० सामन्यांपैकी ७ सामने संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना जिंकले आहेत.
किंग्स्टन ओव्हल हवामान अहवाल?
AccuWeather ने दिलेल्या हवामान अंदाजानुसार, ब्रिजटाउनमध्ये गुरुवारी कमाल तापमान ३२°C आणि किमान २६°C पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. अधूनमधून ढगांसह संपूर्ण सामन्यात पावसाची ७% शक्यता आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.००वाजता सामन्याला सुरुवात होईल.
मी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला एकदिवसीय सामना भारतात कुठे पाहू शकतो?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवर होईल. डीडी स्पोर्ट्स हा सामना वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित करेल. हे फक्त मोफत DTH वर पाहता येईल. तसेच, हा सामना तुम्ही जिओ सिनेमा आणि फॅनकोड अॅप आणि वेब साइटवर ऑनलाइन पाहू शकता. तुम्ही जिओ सिनेमा अॅप किंवा वेबसाइटवर सामना विनामूल्य पाहू शकाल. त्याचबरोबर फॅनकोडवर पाहण्यासाठी निश्चित किंमत मोजावी लागेल.