भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडीज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश मिळवले. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा संघाने दमदार कामगिरी करून यजमानांचा ३-० असा पराभव केला. वेस्ट इंडीजच्या भूमीवर एकदिवसीय मालिकेत ‘क्लीन स्वीप’ देणारा शिखर धवन पहिला भारतीय कर्णधार ठरला. विजयानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार शिखर धवन खेळाडूंवरती प्रचंड खूश आहेत. विजयानंतर सर्वांनी मिळून ड्रेसिंग रूममध्ये आनंदोत्सव साजरा केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या जल्लोषाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
बीसीसीआयच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये राहुल द्रविड म्हणाला, “हा संघ तरुण होता. इंग्लंडमध्ये खेळणारे फारसे लोक वेस्ट इंडीजमध्ये खेळत नव्हते. पण, तुम्ही ज्या पद्धतीने कामगिरी केली ही संघासाठी चांगली बाब आहे. शाब्बास शिखर, तू खूप चांगले नेतृत्व केले.”
यानंतर कर्णधार शिखर धवननेही संघाच्या मेहनतीचे कौतुक केले. यानंतर विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शिखर धवनने फिल्मी पद्धतीने घोषणा दिल्या. “जेव्हा मी म्हणेल आपण कोण? तेव्हा तुम्ही सर्वांनी चॅम्पियन असे म्हणा,” अशा सूचना त्याने खेळाडूंना दिल्या. त्याची सूचना ऐकून ड्रेसिंग रूममध्ये एकच हशा पिकला.
हेही वाचा – ‘हा कोणाचा मुलगा आहे?’ पत्नी हेझलच्या पोस्टवरील युवराज सिंगची कमेंट व्हायरल
बुधवारी (२७ जुलै) झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसाने अनेकवेळा अडथळा आणला. मात्र, शुबमन गिलची फलंदाजी आणि युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराजच्या अप्रतिम कामगिरीमुळे भारताने वेस्ट इंडीजवर सहज विजय मिळवला.