भारत आणि विंडीज यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात दोन दिवसांचा खेळ झाला आहे. या सामन्यात विंडीजने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद ९४ अशी धावसंख्या उभारली. तर भारताने पहिल्या डावात ६४९ धावांचा डोंगर उभा केला. त्यामुळे या कसोटी सामन्यात भारताचे वर्चस्व आहे. या सामन्यात भारताकडून पृथ्वी शॉने पदार्पणात शतक झळकावले. त्याने १३४ धावा केल्या आणि आपली निवड सार्थ ठरवली.
पृथ्वीने १५४ चेंडूत १३४ धावा केल्या. या खेळीत त्याने १९ चौकार लगावले. त्याच्या या खेळीबाबत सर्व स्तरातून त्याचे कौतुक करण्यात आले आहे आणि अनेक दिवस टीकेचे लक्ष्य ठरत असलेल्या निवड समितीनेही सुटकेचा निश्वास टाकला. ‘पृथ्वी शॉ हा उत्तम फलंदाज आहे. तो जरी पहिलीवहिली कसोटी खेळत असला तरी तसे अजिबात वाटले नाही. पृथ्वीची फलंदाजी ही ५० कसोटी सामने खेळल्याचा अनुभव असल्यासारखी वाटली’, अशा शब्दात एमएसके प्रसाद यांनी त्याची स्तुती केली.
पृथ्वीने पहिल्याच सामन्यात चांगला खेळ केला. त्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळाले, तर तो भविष्यात भारताकडून दीर्घ काळ खेळेल, असेही ते म्हणाले.