भारत आणि विंडीज यांच्यात २१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान एकदिवसीय मालिका होत आहे. यातील पहिला सामना गुवाहाटी मध्ये खेळला जात असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कसोटी मालिका २-० अशी निराशाजनक पद्धतीने गमवावी लागल्याने विंडीजचा संघ पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरला असला तरी भारताचे पारडे जड असल्याने भारतीय संघ सध्या नव्या चेहऱ्यांना संधी देत आहे.

आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून ऋषभ पंतला संधी देण्यात आली. त्याला संधी मिळणार हे अपेक्षित होते. मात्र महेंद्रसिंग धोनी आणि पंत या दोघांनाही संधी मिळणार का? याबाबत साशंकता होती. पण धोनीसह पंतलाही वन-डे संघात स्थान मिळाले. त्याने इंग्लंड दौऱ्यावर कसोटी संघात पदार्पण केले होते. त्याआधी २०१७मध्ये त्याने इंग्लंडविरुद्धच टी२० संघात पदार्पण केले होते. आज वयाच्या २१ व्या वर्षी त्याने भारतीय संघाकडून एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. त्यामुळे भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात पदार्पण करणारा तो दुसरा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला.

पंतचे वय २१ वर्षे आणि १७ दिवस आहे. तिन्ही प्रकारात पदार्पण करणारा सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आहे.

त्याने १९ वर्षे व १५२ दिवसांचा असताना भारतीय संघाकडून तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. इशांतने २००७ साली बांगलादेशविरुद्ध कसोटीत, त्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणि २००८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 संघात पदार्पण केले होते.

Story img Loader