विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने २० षटकात २ बाद १९५ धावा केल्या. भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नाबाद झंझावाती शतकाच्या (१११*) बळावर भारताने विंडीजपुढे १९६ धावांचे मोठे आव्हान ठेवले. या बरोबर रोहितने आपल्या टी२० कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. त्याने हा पराक्रम करत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.
रोहितने ५८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. याबरोबरच टी२० प्रकारात ४ शतक झळकावणारा तो पहिलावहिला फलंदाज ठरला. या बरोबरच रोहितने सर्वात जलद शतक झळकावण्याचा संयुक्त विक्रम केला. रोहितने नाबाद १११ धावांची खेळी केली. त्यात त्याने ८ चौकार आणि ७ षटकार लगावले.
दरम्यान, नाणेफेक जिंकून विंडीजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट याने गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला. रोहित आणि शिखरने जोरदार फलंदाजी करत भारताला १२३ दहावीची भक्कम सलामी दिली. पण शिखर ४३ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ फलंदाजीत बढती मिळालेला पंत ५ धावांवर तंबूत परतला. राहुलने १४ चेंडूत नाबाद २६ धावांची खेळी करून रोहितला साथ दिली.