विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारताने ५ गडी राखून विजय मिळवला. भारताच्या कुलदीप यादवने ३ बळी टिपत विंडीजला १०९ धावांत रोखले. विंडीजकडे टी२० चा अनुभव असलेल्या तगड्या फलंदाजांची फौज होती. पण भारताच्या गोलंदाजीपुढे त्यांना फारसा संघर्ष करता आला नाही. निर्धारित २० षटकात विंडीजच्या संघाने ८ बाद १०९ धावांपर्यंत मजल मारली.

विंडीजच्या डावात कुलदीपने ३ तर उमेश यादव, खलील अहमद, जसप्रीत बुमराह आणि कृणाल पांड्या या चौघांनी १-१ गडी बाद केला. तर एकदिवसीय मालिकेत विंडीजला आशेचा किरण दाखवलेला होप धावबाद झाला. शिमरॉन हेटमायर आणि होप यांच्यात धाव घेण्यावरून गोंधळ झाला आणि तो बाद झाला. दोनही फलंदाज एकाच दिशेला धावले आणि राहुलने दुसऱ्या ठिकाणी थ्रो फेकून होपला बाद केले. पण तसे करताना राहुलच्या हातून एक छोटी चूक घडली होती. या चुकीनंतर कर्णधार रोहित शर्मानेही डोक्यावर हात मारुन घेतला होता.

काय झाली घटना –

वेस्ट इंडिजचे होप आणि हेटमायर हे दोघे फलंदाजी करत होते. त्यावेळी एक धाव घेताना दोघांमध्ये योग्य समन्यवय पाहायला मिळाला नाही आणि दोघेही एकाच टोकाकडे धावत गेले. यावेळी दुसऱ्या टोकाला धावचीत करण्याची सुवर्णसंधी होती. चेंडू राहुलच्या हातात होता आणि त्याच्याकडे चेंडू फेकण्यासाठी पुरेसा वेळ होता. पण उत्सहाच्या भरात त्याने फेकलेला थ्रो यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या डोक्यावरून गेला. त्यावेळी एक गोष्ट चांगली घडली, ती म्हणजे कार्तिकच्या मागे उभ्या असलेल्या मनीष पांडेने तो चेंडू उडी मारून पकडला आणि रनआऊट केले. यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या डोक्यावरून चेंडू गेला त्यावेळी रनआऊटची संधी भारताने गमावली, असे वाटत होते. पण मनीष पांडेच्या प्रसंगावधानामुळे होप बाद झाला.

हा सारा प्रकार घडल्यानंतर सर्व खेळाडूंनी सुटकेचा निःश्वास टाकला. होप हा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अशा वेळी त्याला जर जीवदान मिळाले असते, तर कदाचित त्याने भारताच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले असते. पण भारताच्या सुदैवाने तसे घडले नाही आणि भारताने सामना ५ गडी राखून जिंकला.

Story img Loader