Jio Cinema Bags Digital Streaming Rights India vs West Indies: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाला आता सुमारे एक महिन्याचा दीर्घ विश्रांती मिळाली आहे. टीम इंडियाला आपली पुढील आंतरराष्ट्रीय मालिका वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळायची आहे. १२ जुलैपासून टीम इंडिया यजमानांविरुद्ध २ सामन्यांच्या कसोटी मालिकेने दौऱ्याची सुरुवात करेल. जिओ सिनेमाने या टूरसाठीचे डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईव्ह टेलिकास्टचे अधिकार विकत घेतले आहेत.
डिजीटल स्ट्रीमिंग अधिकार संपादन करण्यासोबतच जिओ सिनेमाने चाहत्यांसाठी एक मोठी घोषणा देखील केली आहे. या संपूर्ण मालिकेदरम्यान जिओ सिनेमा हे सामने विनामूल्य प्रसारित करेल. याशिवाय, जिओचा ग्राहक नसला तरी चाहत्यांना सामना विनामूल्य पाहता येणार आहे.
आयपीएलच्या १६व्या हंगामात, सामने डिजिटल प्लॅटफॉर्मवर फक्त जिओ सिनेमावर थेट प्रक्षेपित केले गेले. इंग्रजी आणि हिंदी भाषांव्यतिरिक्त, चाहत्यांना वेस्ट इंडिज दौऱ्यावरील सामन्यांची भोजपुरी, पंजाबी, तमिळ तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकता येईल. आयपीएलचे डिजिटल हक्क विकत घेण्यासाठी Jio Cinemaने US$ २.९ बिलियन दिले होते. संपूर्ण हंगामात डिजिटल टेलिकास्ट दरम्यान जिओ सिनेमाला सुमारे १७०० कोटी व्ह्यूज मिळाले.
२ कसोटी व्यतिरिक्त भारतीय संघ ३ वन डे आणि ५ टी२० सामने खेळणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नवीन आवृत्तीची सुरुवात भारतीय संघ १२ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेने होईल. हा सामना डॉमिनिकाच्या मैदानावर होणार आहे. त्याचवेळी, मालिकेतील दुसरा कसोटी सामना २० जुलैपासून त्रिनिदादमध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होतील.
कसोटी मालिका संपल्यानंतर २७ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान उभय संघांमध्ये ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. यानंतर ३ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट दरम्यान ५ सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील शेवटचे २ सामने अमेरिकेतील फ्लोरिडाच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत.
फेसबुक-यूट्यूबवर पाहा महिला भारतीय संघाचे लाईव्ह सामने
भारत आणि बांगलादेश महिला सांघातील टी२० मालिका ९ जुलै रोजी सुरू होणार असून वन डे मालिकेची सुरुवात १६ जुलै रोजी होणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीबीच्या अधिकृत फेसबूक पेज आणि यूट्यूब चॅनलवर या मालिकाचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. म्हणजेच या दोन्ही मालिका पाहण्यासाठी चाहत्यांना कुठलेच पैसे खर्च करावे लागणार नाहीत. भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी (६ जुलै) या मालिकेसाठी बांगलादेशमध्ये दाखल झाला आहे.