विंडीज विरुद्ध भारत टी२० मालिका रविवारपासून कोलकाता येथे सुरु होत आहे. भारताने कसोटी मालिका २-० ने जिंकली. त्यानंतर एकदिवसीय मालिकाही ३-१ ने जिंकली. पण या दोन मालिकांमध्ये विंडीजचा संघ तुलनेने दुबळा होता. टी२० मालिकेत विंडीजने आपला तगडा संघ उतरवला असून त्यात अनेक अनुभवी नावे आहेत. त्यामुळे ही टी२० मालिका भारताला सोपी जाणार नाही, असे सूचक वक्त्यव्य विंडीजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा याने केले आहे. एका मुलाखतीत त्याने हे मत व्यक्त केले.
टी२० हा खेळाचा छोटा प्रकार आहे. या क्रीडाप्रकाराचा कालावधी कमी असतो. त्यामुळे टी२० मध्ये विंडीजच्या खेळाडूंमध्ये नैसर्गिक गुणवत्ता दिसून येईल आणि त्याचा संघाला फायदा होईल. शिमरॉन हेटमायरसारख्या खेळाडूने एकदिवसीय मालिका गाजवली. त्याने आपला तडाखेबाज खेळ दाखवून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे मला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि तो त्या अपेक्षा पूर्ण करेल, असा विश्वास लाराने व्यक्त केला.
कार्लोस ब्रेथवेट, कायरन पोलार्ड, डॅरेन ब्राव्हो यासारखे अनुभवी खेळाडू संघात असणार आहेत. त्यामुळे संघाला एक वेगळी ऊर्जा मिळेल. हा असा संघ आहे ज्यात सध्याच्या घडीला भारताला पराभूत करण्याची क्षमता आहे, असेही तो म्हणाला. मात्र, भारताचा संघ हा सातत्यपूर्ण कामगिरी करतो आहे. त्यातच तो घरच्या मैदानावर सामने खेळणार आहे. या साऱ्याचा त्यांना फायदा होईल, असेही लाराने नमूद केले.
कोहलीच्या संघातील अनुपस्थितीबाबतही त्याने मत व्यक्त केले. भारताच्या संघात चांगले टी२० खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांना कोहलीची उणीव भासणार नाही. तसेच रोहित शर्माने आशिया चषकात आणि आयपीएलमध्ये आपले नेतृत्वकौशल्य सिद्ध केले आहे. त्यामुळे भारताला कोहलीचे संघात नसणे फारसे जाणवणार नाही, असेही लाराने स्पष्टपणे सांगितले.