विंडीजविरुद्धच्या उर्वरित तीन सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार या वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. तर मोहम्मद शमीला संघातून वगळण्यात आले आहे. रोटेशन योजनेप्रमाणे या तीन सामान्यांसाठी पृथ्वी शॉ ला संधी मिळेल, अशी चर्चा क्रिकेटवर्तुळात होती. मात्र या मालिकेत त्याला संधी मिळू शकलेली नाही.
Announcement: #TeamIndia for last three ODIs against Windies announced. Jasprit Bumrah & Bhuvneshwar Kumar are back in the side #INDvWI pic.twitter.com/jzuJw4Sana
— BCCI (@BCCI) October 25, 2018
या मालिकेतील पहिले दोन सामने झाले असून भारत १-० ने आघाडीवर आहे. यातील दोनही सामने हे मोठ्या धावसंख्येचे झाले. पहिल्या सामन्यात विंडीजने प्रथम फलंदाजी करत ३२२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने हे आव्हान ८ गडी राखून सहज पूर्ण केले. दुसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ३२१ धावा केल्या. या सामन्यात भारतीय गोलंदाज ३००हून अधिक धावांचा बचाव करतील, अशी साऱ्यांना अपेक्षा होती. पण तसे न होता, विंडीजने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे या मालिकेतील उर्वरित ३ सामन्यांसाठी भारताच्या संघात २ बदल करण्यात आले असून बुमराह आणि भुवनेश्वर या दोन अनुभवी वेगवान गोलंदाजांचे पुनरागमन करण्यात आले आहे.
या तीन सामन्यांसाठी आधीच्या संघातून केवळ मोहम्मद शमीला वगळण्यात आले आहे. शमीने पहिल्या एकदिवसीय सामन्यात १० षटकात २ गड्याच्या मोबदल्यात ८१ धावा खर्चिल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात १० षटकात १ गड्याच्या मोबदल्यात ५९ धावा खर्च केल्या होत्या.
उर्वरित ३ एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, अंबाती रायुडू, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, युझवेन्द्र चहल, कुलदीप यादव, खलील अहमद, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार