कसोटी व वन-डे मालिकेतील कामगिरीची पुनरावृत्ती करत भारताने विंडीजविरुद्धची टी-२० सामन्यांची मालिका २-० ने खिशात घातली आहे. कर्णधार रोहित शर्माने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने विंडीजला १९६ धावांचं आव्हान दिलं. रोहितने नाबाद १११ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल विंडीजचा संघ केवळ १२४ धावा करु शकला, भारतीय गोलंदाजीसमोर विंडीजच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. दरम्यान कालच्या सामन्यात एकूण १० विक्रमांची नोंद करण्यात आली.

१ – विराट कोहलीला मागे टाकत रोहित शर्मा भारताचा टी-२० क्रिकेटमधला सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. कोहलीच्या नावावर ५८ डावांमध्ये २१०२ धावा जमा आहेत, रोहितने कालच्या शतकी खेळीदरम्यान २२०३ धावा करत पहिलं स्थान पटकावलं.

३ – रोहित आणि शिखर धवनची टी-२० क्रिकेटमधली ही तिसरी शतकी भागीदारी ठरली आहे.

४ – रोहित शर्माचं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधलं हे चौथं शतक ठरलं, रोहितने न्यूझीलंडच्या कॉलिन मुनरोचा विक्रम मोडीत काढला. मुनरोच्या नावावर ३ शतकं जमा आहेत.

६ – एकंदर टी-२० क्रिकेटमधलं रोहित शर्माचं २७९ डावांमधलं हे सहावं शतक ठरलं. या यादीमध्ये ख्रिस गेल, ब्रँडन मॅक्युलम, ल्युक राईट, मिचेल क्लिंगर हे खेळाडू रोहितच्या पुढे आहेत.

१९ – आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर १९ अर्धशतकी खेळी जमा आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली (१८ अर्धशतकं) चा अपवाद वगळला तर एकही फलंदाज रोहितच्या कामगिरीच्या जवळपास फिरकू शकला नाहीये.

६९ – २०१८ सालात रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६९ षटकार ठोकले आहेत. रोहितने अशी कामगिरी करत २०१७ साली आपल्याच नावावर असलेला ६५ षटकारांचा विक्रम मोडला आहे.

९६ – आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधे रोहितच्या नावावर ९६ षटकारांची नोंद आहे. रोहितने काल न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्युलमचा विक्रम मोडीत काढला. सध्या वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल रोहितच्या पुढे आहे.

१११ –
दुसऱ्या टी-२० सामन्यात रोहितने केलेली १११ धावांची खेळी ही टी-२० क्रिकेटमधली भारतीय फलंदाजांची दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. २०१७ साली रोहितनेच श्रीलंकेविरुद्ध ११८ धावा पटकावल्या होत्या.

१२६८ –
टी-२० क्रिकेटमध्ये रोहित-शिखर जोडीच्या नावावर ३९ डावांमध्ये १२६८ धावा जमा आहेत. या कामगिरीसह रोहित-शिखर जोडी टी-२० क्रिकेटमधली ही सर्वात यशस्वी जोडी ठरली आहे.

११,१३६ – तिन्ही क्रिकेटमध्ये मिळून रोहित शर्माने केलेल्या धावा ११,१३६. यासह रोहितने व्ही.व्ही.एस. लक्ष्मणचा विक्रम मोडला आहे.

Story img Loader