IND vs WI : भारत विरुद्ध विंडीज दुसऱ्या कसोटीचा तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. या सामन्यात विंडीजचा दुसरा डाव १२७ धावांत आटोपला. त्यामुळे भारतापुढे आता ७२ धावांचे अंतिम लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सामन्यातील २ दिवसांहून अधिक कालावधीचा खेळ शिल्लक आहे.

विंडीजच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. ६ धावांवर असताना विंडीजने २ गडी गमावले. क्रेग ब्रेथवेट शून्यावर बाद झाला. त्यानंतर संघाची धावसंख्या ६ असताना भारताने विंडीजला दुसरा धक्का देत कायरन पॉवेलला तंबूत धाडले. त्यानंतर हेटमायर १७ धावांवर तर होप २८ धावांवर बाद झाला. या दोघांमध्ये ३९ धावांची भागीदारी झाली. हेटमायरला कुलदीप यादवने तर होपला जाडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. चहापानाच्या विश्रांतीच्या काही काळ आधी पुन्हा विंडीजला एकापाठोपाठ दोन धक्के बसले. गेल्या डावातील शतकवीर रोस्टन चेस आणि शेन डावरीच हे दोघे झटपट बाद झाले. त्यामुळे चहापानापर्यंत विंडीजची अवस्था ६ बाद ७६ अशी झाली होती. त्यानंतर तिसऱ्या सत्रातदेखील विंडीजच्या फलंदाजांना फारशी छाप पाडता आली नाही. होल्डर(१९), अॅम्ब्रीस (३८), वॅरीकन (७) आणि गॅब्रियल (१) हे झटपट बाद झाले. त्यामुळे त्यांचा डाव अवघ्या १२७ धावांत आटोपला.

भारताचा पहिला डाव ३६७ धावांत संपुष्टात आला आणि उपहाराची विश्रांती घेण्यात आली. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने पाच बळी घेत भारताचा डाव लवकर संपवला. काल दुसऱ्या दिवसअखेर भारताने ४ बाद ३०८ धावांपर्यंत मजल मारली होती. त्या धावसंख्येवरून आज खेळाला सुरूवात झाली. दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारताने वर्चस्व राखले होते. पण आज तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतासाठी अतिशय खराब झाली. दिवसाच्या सुरुवातीच्या खेळात कर्णधार जेसन होल्डर याने एकाच षटकात खेळपट्टीवर स्थिरावलेला अजिंक्य रहाणे (८०) आणि रवींद्र जाडेजा (०) याला बाद केले. विशेष म्हणजे हे षटक निर्धाव टाकण्यात त्याला यश आले. त्यानंतर ऋषभ पंत ९२ धावांवर बाद झाला. पाठोपाठ कुलदीप यादव (६) आणि उमेश यादव (२) धावांवर बाद झाला. पण अश्विनने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत भारताला साडेतीनशे पार मजल मारून दिली. अखेर गब्रीएलने अश्विनचा ३५ धावांवर त्रिफळा उडवला. भारताकडून पृथ्वी शॉ, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांनी चांगली कामगिरी केली. कोहली वगळता तीनही खेळाडूंनी अर्धशतक ठोकले.

Story img Loader