पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने यजमान विंडीजला तब्बल ३१८ धावांनी पराभूत केले. ४०० धावांहून मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा दुसरा डाव केवळ १०० धावांमध्ये आटोपला. जसप्रीत बुमराहने ५, इशांत शर्माने ३ आणि मोहम्मद शमीने २ बळी घेत भारताला विजय मिळवून दिला. दमदार फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला सामनावीर घोषित करण्यात आले. पण तरीही सामन्यात विराटची चांगलीच चर्चा रंगली.

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात कोहलीने एका गाण्यावर ठेका धरला होता. त्यानंतर एकदिवसीय सामन्यात विराटने ख्रिस गेल सोबत डान्सच्या काही स्टेप्स केल्या होत्या. या साऱ्याची चर्चा अजूनही संपली नसताना विराटचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट दांडिया नृत्यासारखा सेलिब्रेशन करताना दिसला. एका चाहत्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, भारताच्या दुसऱ्या डावात रहाणेचे शतक (१०२) आणि हनुमा विहिरीच्या ९३ धावा या खेळीच्या जोरावर भारताने विंडीजला विजयासाठी ४१७ धावांचे अंतिम लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजच्या फलंदाजांची पुरती दैना उडाली. जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे विंडीजचे फलंदाज हतबल झाले. त्यामुळे यजमान विंडीजच्या डावाची अवस्था ९ बाद ५० अशी झाली होती. शेवटच्या गड्यासाठी केमार रोच आणि कमिन्स यांनी ५० धावांची भागीदारी केली आणि विंडीजला १०० चा आकडा गाठून दिला. पण अखेर इशांत शर्माने केमार रोचला माघारी पाठवत भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. विंडीजकडून केवळ तीन खेळाडूंना दोन आकडी धावसंख्या गाठता आली. त्यातही ८ व्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या केमार रोचने सर्वाधिक ३८ धावा केल्या. भारतातर्फे बुमराहने ५, इशांतने ३ तर शमीने २ गडी टिपले.

Story img Loader