Virat Kohli Carry Drinks During Break: टीम इंडियाने, आपली बेंच स्ट्रेंथ तपासण्यासाठी आणि विश्वचषकापूर्वी नवीन टीम कॉम्बिनेशन शोधण्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे ‘सराव सामन्यात’ रूपांतर केले. ज्यामुळे नवोदित कॅरेबियन संघाने सहा विकेट्सने भारतावर विजय मिळवला. प्रयोगाच्या नावाखाली या सामन्यात अतिरेक पाहायला मिळाला. संघाचे दोन सर्वात अनुभवी फलंदाज कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या सामन्यात खेळले नाहीत आणि त्यांच्याऐवजी संघ व्यवस्थापनाने संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला. मात्र, संपूर्ण संघ अवघ्या १८१ धावांत आटोपल्यावर दोन्ही वरिष्ठांना विश्रांती देण्याचा निर्णय टीम इंडियावरच उलटला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट झाला वॉटरबॉय, रोहितला विश्रांती

तुम्ही विराट कोहलीला खेळापासून दूर ठेवू शकता, पण खेळ विराट कोहलीपासून दूर जाणार नाही. कालच्या सामन्यात तो मैदानात पोहोचल्यावर त्याच्या हातात बॅट नाही तर बाटल्या होत्या. ड्रेसिंग रुममध्ये विश्रांती घेतल्यानंतर तो युजवेंद्र चहलसोबत पाणी घेऊन मैदानावर पोहोचला. ३७व्या षटकानंतर भारताची धावसंख्या १६७/७ असताना, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव क्रीजवर धावा काढण्यासाठी झगडत होते. विराट मैदानात येत असताना कॅमेरामनने मैदानात प्रवेश करणाऱ्या दोन खेळाडूंकडे लक्ष केंद्रित केले. ते दुसरे-तिसरे कोणी नसून विराट कोहली आणि युजवेंद्र चहल होते.

हेही वाचा: IND vs WI: विश्वचषक न खेळणाऱ्या वेस्ट इंडीजकडून भारताच्या पराभवानंतर राहुल द्रविडचे मोठे विधान; म्हणाला, “रोहित-विराटला विश्रांती…”

सर्व प्रयोग अयशस्वी

विश्वचषकापूर्वी आपली प्लेइंग इलेव्हन आजमावण्याऐवजी वेगवेगळे प्रयोग करत असलेली टीम इंडिया या सामन्यात अपयशी ठरली. संजू सॅमसन विश्वचषक संघात दुसरा किंवा तिसरा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सामील होऊ शकतो. अशा स्थितीत त्याची फलंदाजी क्रमवारी पाचवी किंवा सहावी असू शकते, पण विराटच्या जागी त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि रवींद्र जडेजा यांच्याआधी जेव्हा अक्षर पटेलला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आले तेव्हा हे आणखी आश्चर्यचकित करणारे होते. मात्र, हे सर्व प्रयोग फसले आणि हे दोघेही स्वस्तात बाद झाले.

हेही वाचा: Stuart Broad Retirement: अखेर तो क्षण जवळ आलाच! ८००हून अधिक विकेट्स घेणारा स्टुअर्ट ब्रॉड होणार निवृत्त

टीम इंडियाचा सहा विकेट्सनी पराभव झाला

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ अवघ्या १८१ धावांवर गारद झाला. ब्रिजटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात सलामीला आलेला डावखुरा फलंदाज इशान किशन (५५) याने जर अर्धशतक झळकावले नसते तर संघाची अवस्था आणखी बिकट झाली असती. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने हे लक्ष्य ३७व्या षटकात चार विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना १ ऑगस्ट रोजी होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi virat kohli seen in a different role in second odi despite rest new responsibility won everyones heart avw
Show comments