Rohit Sharma on Team India: वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यासाठी गेलेल्या भारतीय संघात अनुभवी वेगवान गोलंदाज म्हणून केवळ मोहम्मद सिराजच्या नावाचा समावेश आहे. याशिवाय संघातील अन्य वेगवान गोलंदाजांमध्ये जयदेव उनाडकट, नवदीप सैनी आणि मुकेश कुमार यांचा समावेश आहे. अष्टपैलू शार्दुल ठाकूरही आहे. यापैकी कुणालाही वेस्ट इंडिजमध्ये कसोटी फॉरमॅटमध्ये खेळण्याचा अनुभव नाही. यावर कर्णधार रोहित शर्माला विचारले असता, वेगवान गोलंदाजांबाबतची त्याची व्यथा सर्वांसमोर आली.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार रोहित शर्माला जेव्हा अननुभवी वेगवान गोलंदाजीबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने उत्तर दिले की, “येथे वेगवान गोलंदाजांनी भरपूर विकेट्स घेतल्याचे आम्ही पाहिले आहे, पण आता जे संघात आहेत तेचं आहेत. खेळाडूंना दुखापत झाल्यावर असे निर्णय घ्यावे लागतात.”
रोहित पुढे म्हणाला की, “यावेळी आमचे अनेक गोलंदाज जखमी आहेत. म्हणूनच सध्या आपल्याकडे असलेले निवडक गोलंदाजांना घेऊन रोटेशननुसार खेळवावे लागेल. आमच्याकडे वेगवान गोलंदाजांची सध्या फळी नाही. त्यामुळे त्यांचे योग्य व्यवस्थापन करावे लागेल. त्यामुळेच आम्ही अनुभवी वेगवान गोलंदाजांसह या दौऱ्यावर आलो नाही.”
आगामी वर्ल्डकपच्या दृष्टीने ही बाब महत्वाची- रोहित शर्मा
कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त गोलंदाजांच्या बाबतीत म्हणाला की, “ जसप्रीत बुमराहसारखा खेळाडू अजूनही त्याच्या दुखापतीतून सावरतो आहे. त्यामुळे तो विश्वचषकापर्यंत तंदुरस्त होणे खूप महत्वाचे आहे. तसेच, भारताकडे असे चांगले युवा गोलंदाज आहेत पण त्यांना अधिक सामने खेळण्याची गरज आहे. सध्या बोलर्सची लाईन अजून लागली नाही. मात्र, ती लवकरात लवकर लागावी यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत.”
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे जेणेकरून तो आगामी आशिया चषक आणि त्यानंतरच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पूर्णपणे तयारी करू शकेल. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. अशा परिस्थितीत टीम इंडियासाठी या कसोटी मालिकेत मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
रोहितने पाकिस्तानची युक्ती अवलंबली
विंडसर पार्क डॉमिनिका येथे शेवटचा सामना २०१७ मध्ये पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला गेला होता. या सामन्यात पाकिस्तानी संघाने १०१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज यासिर शाहने अप्रतिम खेळ दाखवला. त्याने पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतले. त्या सामन्यात फिरकीपटूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. याच कारणामुळे आता ६ वर्षांनंतर रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये २ फिरकीपटू खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.